42 वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाले सिंचनासाठी पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

42 वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाले सिंचनासाठी पाणी

42 वर्षांच्या संघर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाले सिंचनासाठी पाणी

येवला (जि. नाशिक) : डोंगरगाव येथील साठवण तलाव कधी पूर्ण भरलाच नाही आणि जेव्हा भरला तेव्हा त्यावरील वितरिकेला कधी पाणी मिळालेच नाही. मात्र पिंपळखुटे बुद्रुक व परिसरातील शेतकऱ्यांच्या संघर्षामुळे अखेर ४० वर्षांनंतर या वितरिकेला पाणी सुटले आहे. यामुळे सुमारे शंभर एकराच्या आसपास पिकांना याचा फायदा होत आहे.

शेतकऱ्यांची उच्च न्यायालयात धाव

१९७० च्या सुमारास डोंगरगाव परिसरातील गावाचा शेती सिंचनाचा, जनावरांचा पाणी प्रश्न मिटावा यासाठी हा लघुतलाव मंजूर करून रोहयो अंतर्गत १९७२ पर्यंत या लघुतलावाचे काम पूर्ण केले होते. पुढे त्याला वितरिकाही करण्यात आली. या वितरिकेला १९७६, ८० व ८३ च्या दरम्यान पाणी सोडल्याचे सांगितले जाते. मात्र त्यानंतर अद्यापही पाणी सोडले जात नव्हते. दहा वर्षापासून डोंगरगावचा तलाव भरला जातो, पण डोंगरगाव तलावातून पिंपळखुटे बुद्रुक व तळवाडे परिसरासाठी पाणी जाणारी वितरिका बुजली होती. या संदर्भात पिंपळकुटे येथील शेतकऱ्यांनी मागील वर्षी उपोषण केल्यावर पालकमंत्री छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) सूचनेनुसार पाटबंधारे विभागातर्फे सुमारे पाच किलोमीटरची ही वितरिका खोदून काढण्यात आली. त्यामुळे यावर्षी धरण पूर्ण भरल्याने पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करत होते.

हेही वाचा: नाशिक : पोलिस व भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये 'तू तू मै मै'

डोंगरगाव धरणातून पाणी सोडू नये, पिण्यासाठी पाणी ठेवावे ही मागणी करत काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. मात्र पिंपळखुटे बुद्रुक येथील शेतकऱ्यांनी आपली बाजू मांडत या तलावात पाणी योजना नसल्याचे निदर्शनास आणून दिले त्यानंतर न्यायालयाने पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवारी (ता.१२) पाटबंधारे विभागातील कर्मचाऱ्याने कालव्याला पाणी सोडले.

पाण्यासाठी ४२ वर्षे प्रतीक्षा

परिसरातील शेकडोंच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. लाभक्षेत्रातील पिंपळखुटे, भुलेगाव, देवठाण, तळवाडे, डोंगरगाव या गावातील शेतकऱ्यांना सुमारे बेचाळीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पाण्याचा लाभ मिळाल्याने या गावातील शेतकर्‍यांनी आनंदोत्सव साजरा केला. सात ते सात दिवस हे पाणी सुरू राहणार असून ८० ते १०० एकरापर्यंत याचा फायदा होऊ शकेल अशी माहिती डॉ. सतीश कुऱ्हे यांनी दिली. डॉ. कुऱ्हे, साहेबराव उंडे, अनिल उंडे, चंद्रकांत आढाव, अण्णा कुर्हे, रखमा पवार, अण्णा पवार, जगन पवार, गोरख अरखडे, संदीप उंडे, हरिभाऊ उंडे, कचरू डुंबरे, बाळू रोठे, दीपक उंडे यासह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा: नाशिक : तिप्पट पैसे करण्याचा मोह महागात; चौघांनी औरंगाबादच्या एकाला गंडविले

Web Title: 42 Years Of Struggle Farmers Got Water For Irrigation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top