Nashik Crime News : परप्रांतीय व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cheating

Nashik Crime News : परप्रांतीय व्यापाऱ्याकडून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची 50 लाखांची फसवणूक

वणी (जि. नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील सहा द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांकडून सुमारे पन्नास लाखांचे द्राक्ष खरेदी करुन परप्रांतीय व्यापारी फरार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत फरारी व्यापाऱ्यावर वणी पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांत गणेश पोपट महाले वय 49 वर्षे धंदा शेती रा. हस्तेदुमाला ता. दिंडोरी यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार हस्तेदुमाला शिवारात शेत गट क्रमांक 290 मध्ये चार एकर क्षेत्रात सोनाका जातीचे द्राक्ष पिक आहे.

सदर द्राक्ष बागाचे उत्पन्न चांगले असल्याने माळेफाटा येथे राहणारा द्राक्ष व्यापारी मोहम्मद अन्वर रा. सितामढी, बिहार याने द्राक्षमाल पाहिला व मालाची खात्री झाल्याने त्याने दिपक उत्तमराव महाले रा. हस्तेदुमाला शिवार ता. दिंडोरी यांचे समक्ष गणेश महाले यांच्या द्राक्ष मालाचा 37/- रुपये किलो प्रमाणे व्यवहार केला.

सदरचा माल त्याने ता. 13/02/2023 रोजी खुडण्यास सुरुवात करुन दररोज माल पाठवुन दिनांक 17/02/2023 रोजी पावेतो एकुण 208 क्विंटल सोनाका दाक्ष माल 37/- रुपये किलो प्रमाणे 7 लाख 69 हजार 600/- रुपयांचा माल खरेदी केला.

माल खुडल्यानंतर ठरल्या प्रमाणे सदर द्राक्ष व्यापाऱ्याकडे वारंवार पैशासाठी मागणी केली असता उदया देतो, परवा देतो असे सांगुण पैसेही दिले नाही व चेकही दिला नाही. दरम्यान २४ फेब्रुवारी २०२३ रोजी पैसे घेण्यासाठी व्यापारी राहात असलेल्या त्याचे माळेफाटा येथील रुमवर गेले असता, सदर व्यापारी आपल्या कपडे व साहित्यासह पलायन केल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

तसेच त्याने दिलेला मोबाईल नंबरही बंद ठेवल्याने त्याच्या ठाव ठिकाणाबाबत सुगावा लागला नाही. दरम्यान गणेश महाले यांच्या प्रमाणेच रामदास शंकर निरगुडे रा. मावडी ता. दिंडोरी यांचा 203 क्विंटल सोनाका माल 34/- रुपये किलो प्रमाणे 7,03,852/- रुपये इतका माल, उत्तम बाबुराव महाले रा. माळेदुमाला यांचा सोनाका माल 572 क्विंटल 43/- रुपये किलो प्रमाणे 17,70,000/- रुपये इतका माल, रविंद्र मुरलीधर ठाकरे रा. संगमनेर ता. दिंडोरी यांचा 152 क्विंटल थॉमसन जातीचा 57/- रुपये किलो प्रमाणे द्राक्षमाल 5.47,000/- रुपये किंमतीचा, मंगेश रघुनाथ घुगे रा. माळेदुमाला ता. दिंडोरी यांचा सोनाका जातीचा द्राक्षमाल 138.57 क्विंटल वजनाचा 40/- रुपये प्रमाणे 5,24,400/- तसेच गोरख गोविंदराव जाधव रा. कोकणगांव ता. दिंडोरी यांचा सोनाका जातीचा द्राक्षमाल 156.70 क्विंटल वजनाचा 41/- रुपये किलोप्रमाणे 6,04,200/- अशा सहा शेतकऱ्यांचा एकुण रक्कम रुपये 49 लाख 19 हजार 052 रुपये किंमतीचा इतका माल खरेदी करुन कोणासही चेक अगर पैसे न देता मोहम्मद अन्वर रा. सितामढी, बिहार याने फसवणूक केल्या प्रकरणी वणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.