पिंपळगाव शहरातील चाळींमध्ये ५० हजार टन कांद्याची साठवणूक; व्यापाऱ्यांना दरवाढीची अपेक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Onion

पिंपळगाव शहरातील चाळींमध्ये ५० हजार टन कांद्याची साठवणूक

पिंपळगाव बसवंत ( जि. नाशिक) : गेल्या दोन वर्षापासून उन्हाळ कांदा भाव खात असल्याने साठवणुकीचा कल यंदाही कायम राहिला आहे. ‘कांद्याची राजधानी’ असा आशिया खंडात नावलौकीक असलेल्या पिंपळगावमधील एक हजारपैकी ८०० चाळी फुल्ल झाल्या आहेत. सुमारे ५० हजार टन उन्हाळ कांद्याची साठवणूक झाली आहे. उर्वरीत २० टक्के चाळीत येत्या आठवड्यात कांदा भरला जाण्याची शक्यता आहे. 50 thousand tons of summer onions have been stored in pimpalgaon city

टिकाऊ, चवदार व गोलाकार यामुळे पिंपळगाव बाजार समितीत विक्रीला येणाऱ्या उन्हाळ कांद्यावर जून ते नोव्हेंबरपर्यंत देश-परदेशाची भिस्त असते. गेल्या दोन वर्षात कांद्याने आठ हजार रूपये प्रतिक्विंटलपर्यंत झेप घेतली. कांद्यात गुंतवणूक करणारे मालामाल झाले होते. यंदाही तेजी कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कांदा खरेदीबरोबरच भाड्याने मिळणाऱ्या चाळींच्या नोंदणी पूर्ण झाल्या आहेत.

शंभर कोटींचा कांदा बंदिस्त…

नफ्याच्या अपेक्षने व्यापाऱ्यांबरोबरच नोकरदार, मध्यवर्गीय नागरिक आर्थिक क्षमता असेल तेवढ्या रकमेची कांदे खरेदी करून चाळींमध्ये साठवतात. पिंपळगाव शहरात सुमारे एक हजार चाळी आहेत. त्यांची प्रत्येकी क्षमता ५० ते ६० टनाची आहे. ८० टक्के चाळी कांद्याने भरल्या असून, सुमारे ५० हजार टन कांदा बंदिस्त झाला आहे. त्याची किंमत सध्याच्या सरासरी दरानुसार १०० कोटी रूपये एवढी आहे. आधुनिक पद्धतीच्या नव्या चाळी उभारल्याने पावसापासून त्याचे संरक्षण होते. प्रती चाळ ५० ते ६० हजार रूपये भाडे आकारले जाते. उत्पादकांना काही समाधानकारक दर मिळत आहे.

हेही वाचा: नाशिकमध्ये नवी नियमावली; जाणून घ्या नेमकं काय सुरु, काय बंद?

मलेशियात लॉकडाउन अन्‌ पाकिस्तानच्या स्वस्त कांद्याचा फटका…

परराज्याबरोबरच कांद्याची निर्यातही दमदार सुरू होते. मलेशिया, कोलंबो, दुबई येथे कांद्याला उठाव होता. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठा अडथळा आणला आहे. मलेशिया लॉकडाउन झाल्याने तेथील मागणी रोडावली आहे. तर, पाकिस्तानचा कांदा स्वस्त मिळत असल्याने दुबईच्या बाजारपेठेत भारतीय कांद्याला मोठा स्पर्धक निर्माण झाला आहे. त्यामुळे यापूर्वी दररोज दीड हजार टन कांदा भारतातून निर्यात व्हायचा. ती निर्यात ५०० टनावर आली आहे. त्यामुळे दर दोन हजार रूपयापर्यंत स्थिर आहेत. पंधरा दिवसानंतर कांद्याच्या दराची झेप उंच राहणार असल्याचे कांद्या व्यापारी सांगतात.

हेही वाचा: पुणे, धुळ्यासह अन्‍य मार्गांवर उद्यापासून धावणार लालपरी

देशातील कांद्याचे उत्पादन पाहता सलग तिसऱ्या वर्षीची उन्हाळ कांद्याच्या दराला तेजी राहणार यात शंका नाही. पिंपळगाव शहरातील बहुतांश चाळी कांद्याने फुल झाल्या आहेत. नाशिकच्या कांद्याची चव व टिकाऊपणा हे वैशिष्ट्ये असल्याने देश-परदेशातून मागणी राहील.

- अतुल शाह, कांदा निर्यातदार, पिंपळगाव बसवंत

loading image
go to top