esakal | रेमडेसिव्‍हिर गैरवापराचा ६८ रुग्‍णालयांवर ठपका; जिल्‍हाधिकारी मांढरेंनी मागविला खुलासा

बोलून बातमी शोधा

suraj mandhare
रेमडेसिव्‍हिर गैरवापराचा ६८ रुग्‍णालयांवर ठपका; जिल्‍हाधिकारी मांढरेंनी मागविला खुलासा
sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : कोरोनाबाधितांवर उपचारादरम्‍यान लागणाऱ्या रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनच्या वापरात शासकीय नियमावलीचे उल्‍लंघन केल्‍याचा ठपका काही रुग्‍णालयांवर ठेवण्यात आला आहे. या संदर्भात ६८ रुग्‍णालयांना नोटीस बजावली असून, संबंधित रुग्‍णालयांनी खुलासा करण्याचे आदेश जिल्‍हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहेत.

शासनाने ठरविलेल्‍या प्रमाणापेक्षा जादा रेमडेसिव्हिरचा वापर संबंधित रुग्‍णालयांत होत असल्‍याचे निदर्शनास आले होते. खुलाशातून समाधानकारक उत्तर मिळाले नाही, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असे श्री. मांढरे यांनी स्‍पष्ट केले. गेल्‍या काही दिवसांत इंजेक्‍शनच्‍या तुटवड्याच्‍या तक्रारी वाढत असताना जिल्‍हा प्रशासनामार्फत इंजेक्‍शन वितरणाबाबतचा डेटा तपासला जातो आहे. या प्रक्रियेत ३२५ पैकी २९४ रुग्णालयांची तपासणी पूर्ण झाली आहे. यात ६८ रुग्‍णालयांमध्ये रेमडेसिव्‍हिरचा अनावश्‍यक वापर सुरू असल्‍याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. शासनाने ठरविलेल्‍या आदर्श प्रमाणाहून इंजेक्शनचा अतिरेक वापर झाला असल्‍याचे सांगितले जात आहे. रुग्णांना इंजेक्‍शन उपलब्‍ध करून देण्याची जबाबदारी रुग्‍णालयांची असताना, काही रुग्णालये इंजेक्शन मिळविण्याची जबाबदारी रुग्णांची असल्याचे सांगत चुकीचा पायंडा पाडत असल्‍याचे प्रशासकीय यंत्रणेचे म्‍हणणे आहे. आवश्‍यकता नसताना रुग्णांकरता इंजेक्‍शन लिहून देणे थांबल्‍यास, रेमडेसिव्‍हिरचा तुटवडा कमी होऊन नातेवाइकांची धावपळदेखील कमी होईल, असे जिल्‍हाधिकारी मांढरे यांचे म्‍हणणे आहे.

हेही वाचा: महामारी आजारांचा चारशे वर्षांचा इतिहास! सोशल मीडियावर संदर्भासह चित्र व वृत्त