Nashik Crime News : अट्टल सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; युनिट 2ची कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime branch arrest suspect

Nashik Crime News : अट्टल सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या; युनिट दोनची कारवाई

नाशिक : सिडको परिसरात महिलांना हेरून सोनसाखळी खेचून नेण्याच्या तयारी असलेल्या दोघा अट्टल सोनसाखळी चोरट्यांना शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले. दोघा संशयितांच्या चौकशीतून शहरातील सोनसाखळी खेचून नेण्याच्या सात गुन्ह्यांची उकल झाली असून संशयितांकडून सव्वा तीन लाखांचे सोने आणि दुचाक्या असा सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (7 cases of pulling gold chains solved 5.5 lakh worth of goods were seized from suspect nashik news)

मुसा सय्यद (रा. आडगाव, नाशिक), सोमनाथ हरीश्चंद्र त्रिभुवन (रा. नाशिक) अशी दोघा संशयित सोनसाखळी चोरट्यांची नावे आहेत. गेल्या २८ जानेवारी रोजी सायंकाळी मंगल राउळ महामार्गावरील बळी मंदिर येथून दर्शन घेऊन पायी जात असताना, त्यांच्या गळ्यातील सोन्याची पोत याच दोघांनी हिसकावून नेली होती.

शहर गुन्हेशाखेच्या युनिट दोनचे पथक या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना हवालदार सोमनाथ शार्दुल यांना संशयित मुसा सय्यद याने साथीदारासह सदरील गुन्हा केल्याची माहिती मिळाली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांना सदरील माहिती दिल्यानंतर, त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने दोघा संशयितांना अंबड लिंक रोडवरील पाटील पार्क येथे साथीदारासह चेनस्नॅचिंगच्या तयारीत असताना शिताफीने पकडले.

पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर संशयितांनी चौकशीत अंबड, आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, उपनगर या परिसरातून रस्त्याने पायी जाणाऱ्या सात महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेल्याची कबुली दिली.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, उपनिरीक्षक पोपट कारवाळ, सहायक उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळी, राजाराम वाघ, हवालदार सोमनाथ शार्दुल, विजय वरंदळ, नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, विवेक पाठक, राजेंद्र घुमरे, संपत सानप, संजय सानप आदींनी ही कारवाई केली.

सराफाला कमी दरात विक्री

दोघा संशयितांनी खेचून आणलेल्या सोनसाखळ्या या खडकाळीतील खडकाळीतील वैभवलक्ष्मी ज्वेलर्सचे सराफ राजेंद्र बुधू सोनार यांना कमी दरात विक्री केल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी राजेंद्र सराफ यास ताब्यात घेऊन गुन्ह्यांतील सोने जप्त केले.

चौकशीत आणखीही गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. यात अंबड, म्हसरूळ हद्दीतील प्रत्येकी दोन, आडगाव, पंचवटी, उपनगरमधील प्रत्येकी एक गुन्हयाची उकल झाली असून, दोघश संशयितांना येत्या सोमवारपर्यंत (ता. ६) पोलीस कोठडी सुनावलेली आहे.

हस्तगत मुद्देमाल

- ३ लाख २४ हजार ४५० रुपयांच्या सोन्याच्या ७ लगड

- स्टनर दुचाकी (एमएच १५ डीबी ५३०१)

- सीडी डिलक्स (एमएच १५ बीव्ही ५०८४)

- ज्युपिटर मोपेड (एमएच १५ एचआर ६७०८)

- असे एकूण : ५ लाख ३४ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल