Nashik News : वाहन स्मार्टकार्डची जीवघेणी प्रतीक्षा! नाशिक विभागात खासगी कंपनीच्या कामाचा नागरिकांना फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RC

Nashik News : वाहन स्मार्टकार्डची जीवघेणी प्रतीक्षा! नाशिक विभागात खासगी कंपनीच्या कामाचा नागरिकांना फटका

मालेगाव (जि. नाशिक) : नाशिक विभागातील मालेगाव, नाशिक येथील परिवहन कार्यालयाचे वाहन नोंदणी स्मार्ट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, नूतनीकरण परवाना व तत्सम दस्तऐवजासाठी वाहनधारकांना मोठी प्रतीक्षा लागत आहे.

परिवहन विभागाने वाहन नोंदणी स्मार्ट कार्ड (आर.सी.) व वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हींग लायसन्स) व परिवहन संबंधित दस्तऐवज, स्मार्ट कार्डची कामे रोजमार्टा टेक्नालॉजिस प्रा. लि. या खासगी कंपनीला दिले आहे.

कंपनीच्या नियोजनशून्य कामाचा फटका ग्राहकांना बसत असून आहे. कंपनीने निर्धारित वेळेत दस्तऐवज न दिल्याने नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कंपनीला दोन वेळा एकत्रित १९ लाख ७१ हजार रुपये तर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने ८० हजार रुपये दंड ठोठावला आहे,

तरीही कामात सुधारणा होत नसल्याने या कंपनीला दिलेले कंत्राटचा रद्द करावे. दंड आकारणीनंतर कंपनीच्या कामात सुधारणेची अपेक्षा आहे. (Deadly wait for vehicle smart card Citizens affected by work of private company in Nashik division Nashik News)

नाशिक विभागात गेल्या तीन आठवड्यात सुमारे साडेसात हजार विविध वाहनांचे नवीन वाहन नोंदणी स्मार्ट कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, नूतनीकरण परवाने व वाहनासंदर्भातील तत्सम दस्तऐवज प्रलंबित आहेत.

नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहा हजार ४५४ वाहनांचे दस्तऐवज प्रलंबित असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वासूदेव भगत यांनी ‘सकाळ’ला सांगितले. कंपनीच्या विशेष कामामुळे परिवहनचे अधिकारी, कर्मचारी वाहनधारकांच्या रोषाला बळी पडत आहेत.

मुळातच रोजमार्टाकडून दस्त, स्मार्ट कार्ड मिळण्यास विलंब होतो. त्यातच डाक विभागाकडील मनुष्यबळाच्या अभावाने या विलंबात आणखी भर पडते. त्याचा फटका वाहनधारकांना बसतो. दस्तऐवज नसल्याने प्रसंगी दंड भरावा लागतो.

असंख्य वाहनधारकांनी याबाबत तक्रारी केल्या आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये नाशिक परिवहन कार्यालयाने प्रथम सहा लाख ७१ हजार व दुसऱ्या वेळेस १३ लाख रुपये दंडाची नोटीस दिली.

मालेगाव उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील साडेतीन हजाराहून अधिक स्मार्ट कार्ड, वाहन परवाने गेल्या काही महिन्यात प्रलंबित होते. याबाबत तक्रारी वाढल्यानंतर येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी परिवहन उपायुक्त संदेश चव्हाण यांच्याशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली.

प्रथम ४८ हजार व नंतर ३२ हजाराचा दंड आकारल्याची नोटिस रोजमार्टाला दिली. या कंपनीने या कामांसाठी वसुंधरा नामक आणखी एक सब कॉन्ट्रॅक्टर नेमल्याचे समजते. श्री. जाधव यांच्या तक्रारीनंतर प्रलंबित परवाने वाहनधारकांना मिळाले. डाक विभागाने या विलंबात भर पाडली.

नवीन स्मार्टकार्ड (आर.सी.) प्रक्रिया

- ऑनलाइन पध्दतीने गाडीची नोंदणी

- एचआरसी क्रमांक नंबर प्लेट अपडेट

- डेली नोंदणी डाटा लिस्ट

- रोजमार्टाकडे कार्ड तयार करण्यासाठी माहिती

- स्मार्ट कार्ड तयार होवून परिवहनकडे

- परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी

- की मॅन्युअल सिस्टीम अपडेट (केएमएस)

- स्मार्ट कार्ड व परवाना डाक विभागाकडे

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

डाक विभागाचा उलटा कारभार

परिवहन विभागाकडून स्मार्ट कार्ड येथील डाक कार्यालयात प्राप्त झाल्यानंतर ठराविक पाकिटसाठी हे कार्ड नाशिक येथील मुख्य कार्यालयात जातात. तेथून पुन्हा मालेगावी येतात.

मालेगाव डाक कार्यालयातून येथील उपप्रादेशिक परिवहनच्या कार्यक्षेत्रातील पाच तालुक्यात डिसपॅच होतात. पाकिट तयार करणे, शिक्का, बटवारा यासाठी मानधनावर कर्मचारी आहेत. यामुळे या विलंबात भर पडते.

"मे २२ मध्ये थार जीप खरेदी केली. मालेगावच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात गाडीची नोंदणी झाली. सहा महिने उलटूनही स्मार्ट कार्ड अद्याप मिळालेले नाही. याबाबत परिवहन आयुक्त, उपायुक्त आदींसह सगळीकडे तक्रारी केल्या. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यंत्रणा ठप्प झाल्यासारखे वाटते. वाहन चालकाला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठा दंड ठोठावला जातो. या विलंबाबद्दल होणाऱ्या दंडाचे काय?"

- युवराज सुरेश पवार, उद्योजक, मालेगाव