esakal | कोटबेल येथे वृद्ध शेतकऱ्याचा खून; तब्बल आठ संशयितांना अटक | Nashik Crime
sakal

बोलून बातमी शोधा

8 suspects arrested in Kotbel elderly farmer murder case

कोटबेल येथे वृद्ध शेतकऱ्याचा खून; तब्बल आठ संशयितांना अटक

sakal_logo
By
दीपक खैरनार


अंबासन (जि. नाशिक) : कोटबेल (ता. बागलाण) येथील गोमदरा शिवारातील शेतकरी सहादू खैरनार यांचा चोरीच्या उद्देशाने खून झाला असल्याचे निष्पन्न झाले असून, या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना अटक केली. गेल्या २३ सप्टेबरला खैरनार यांचा खून झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. जायखेड्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी गस्तीवर असताना एका संशयितास या प्रकरणी अटक केली होती.

खैरनार यांनी काही दिवसांपूर्वीच शेतजमीन विक्री केली होती. याची माहिती मिळताच स्थानिक चोरट्यांनी १९ सप्टेंबरला कट-कारस्थान रचून चोरीचा मार्ग, तसेच घरातील सर्व माहिती संकलित केली. २३ सप्टेंबरला मध्यरात्रीनंतर शेती विक्रीचे पन्नास लाख रुपये चोरण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी खैरनार यांच्या घरात प्रवेश केला. या वेळी खैरनार दांपत्यास जाग आली. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच चोरट्यांनी हातपाय पकडून एकाने खैरनार यांच्या छातीवर व पाठीवर कुऱ्हाडीने घाव घातले. त्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे पाहून चोरट्यांनी पोबारा केला.

हेही वाचा: नाशिक : राम-सिता-लक्ष्मण शिल्पाचे पर्यटकांना दुरूनच दर्शन


दरम्यान, सहाय्यक पोलिस निरीक्षक पारधी यांच्यासह कर्मचारी कोटबेल परिसरात गस्तीवर असताना त्यांना रस्त्यावर दोन संशयित जात असल्याचे दिसले. त्यांनी वाहन उभे करून संशयित पंकज ऊर्फ सागर बाजीराव चौधरी (रा. नेर, ता. जि. धुळे) यास ताब्यात घेतले. मात्र, त्याचा साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला होता. संशयित पंकजची चौकशी केली असता त्याने घडलेला प्रकार कथन केला. त्यानुसार मोबाईलच्या आधारावर या प्रकरणात बारा संशयितांचा हात असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी आठ जणांना पोलिसांनी अटक केली. जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी व उपविभागीय पोलिस अधीक्षक पुप्पराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पारधी यांनी पथक तयार करून संशयितांना धुळे, मालेगाव, तसेच गुजरात राज्यातील कच्छ व भुज येथून अटक केली.

पथकातील पोलिस उपनिरीक्षक तुषार भदाणे, पोलिस उपनिरीक्षक नवनाथ रसाळ, हवालदार सुनील पाटील, गोपीनाथ भोये, निंबा खैरनार, उमेश पाटील, पोलिस शिपाई गजानन गोटमवार, राजेंद्र सोनवणे, राहुल मोरे आदींनी ही कामगिरी केली. संशयितांमध्ये पंकज चौधरी याच्यासह भुऱ्या ऊर्फ मुश्ताक सय्यद (रा. लळिंग, ता. जि. धुळे), अंकुश दादाजी पवार (रा. रावळगाव, ता. मालेगाव), विठ्ठल अर्जुन दळवी (रा. जळगाव, ता. मालेगाव), काळू ऊर्फ बळिराम उत्तम सोनवणे (रा. बोरमाळ, ता. मालेगाव), अरुण ऊर्फ आऱ्या संतोष पवार व वसंत प्रभाकर सोनवणे (रा. रावळगाव), सागर कैलास आहिरे (रा. बोरमाळ) या आठ जणांचा समावेश आहे.

हेही वाचा: कांदे-पोहे आणि खमंग चर्चा…

अन्य फरारी संशयितांचा शोध सुरू असून, लवकरच त्यांच्याही मुसक्या आवळल्या जातील.
- श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलिस निरीक्षक, जायखेडा

loading image
go to top