esakal | तब्बल ८२ गावांच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा! जनजागृती ठरली मोलाची
sakal

बोलून बातमी शोधा

yeola

तब्बल ८२ गावांच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा!

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : गेले दोन महिने तालुक्याच्या ग्रामीण भागात कहर माजवलेल्या कोरोनाने दुसऱ्या लाटेत तब्बल पावणेदोनशे बळी घेतल्यानंतर आता कुठे आपला पसारा आवरायला सुरवात केली आहे. पहिल्या टप्प्यात शहराला वेठीस धरलेल्या कोरोनाने दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात गावेची गावे होरपळून निघाली. अनेक कर्त्या पुरुषांच्या जाण्याने कुटुंब उघड्यावर आले (82-villages-Corona-free-nashik-marathi-news)

तब्बल ८२ गावांच्या भाळी कोरोनामुक्तीचा टिळा!

यातही सकारात्मक म्हणजे येवल्यातील उपजिल्हा रुग्णालय, नगरसूल ग्रामीण रुग्णालय, तसेच शहरातील डॉ. काकड, डॉ. शहा, डॉ. सोनवणे, डॉ. पटेल व ग्रामीण भागातील खासगी डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहेत. डॉ. तगारे यांचे आयुर्वेदिक उपचार अनेकांना फायदेशीर ठरले. वाढत्या रुग्णसंख्येच्या काळात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख, सभापती प्रवीण गायकवाड यांच्यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा, आशा कार्यकर्त्या, शिक्षक आदींनी घरोघरी जाऊन केलेले ६७ हजार नागरिकांचे सर्वेक्षण सूचना व औषध उपचार यामुळेही कोरोनाला नक्कीच अटकाव घालता आला. अनेक गावांतील सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व पोलिसपाटलांसह स्थानिक पुढाऱ्यांनी देखील गावोगावी गेलेली जनजागृती यात मोलाची ठरली आहे.

१२३ गावांत शिरकाव

दुसऱ्या लाटेत मार्चच्या पहिल्या आठवड्यात शहरात एकूण रुग्ण ६४३, तर ग्रामीण भागात ६४८ असे समान रुग्ण होते. मात्र आजमितीला हाच आकडा शहराचा एक हजार ३५३, तर ग्रामीण भागाचा तीन हजार ९७२ वर पोचला आहे. मागील महिन्यात रोजच्या आकड्यांमध्ये शहरात पाच ते दहा, तर ग्रामीण भागात २५ ते ५० च्या दरम्यान रुग्ण निघत असल्याने मोठी चिंता वाढली होती. परंतु आता दोन्हीकडेही रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला आहे. तीन आठवड्यांपूर्वी तालुक्‍यातील १२४ पैकी १२३ गावे बाधित होती. आज सकारात्मक परिवर्तन झाले असून, यातील ८२ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. इतर गावेही कोरोनामुक्त होण्याचा आशावाद प्रशासनाला आहे.

येवलेकरांनी रोखले

दुसऱ्या लाटेत शहरात रुग्णांसह मृत्यूचा आकडा कन्ट्रोलमध्ये राहिला असून, रुग्णसंख्या मर्यादित ठेवण्यात प्रशासन व नागरिकांनी यश मिळविले. योग्य आहार, डॉक्टरांचा सल्ला, मास्क व सोशल डिस्टन्सिंग या पातळीवर घेतलेली काळजी उपयुक्त ठरली. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्ण व मृत्यू दुप्पट आहेत. मार्चपासून आजपर्यंत शहरात फक्त ७१० रुग्ण निघाले. तर ग्रामीण भागात तब्बल तीन हजार ३२४ रुग्ण निघाले आहेत. आजही शहरात केवळ ११ रुग्ण असून, ही संख्या ग्रामीण भागात ५८ वर आहे.

एकमेव कौटखेडे कोरोनामुक्त

या लाटेत सर्वत्र हाहाकार उडाला असताना तालुक्यातील कौटखेडे हे एकमेव गाव आहे, की जिथे एकही रुग्ण सापडला नाही. तळवाडे ग्रामपंचायतीअंतर्गत असलेल्या या गावाने कोरोनाचा शिरकाव होणार नाही, यासाठी पुरेपूर काळजी घेतली. बाहेरून गावात कोणी येणार नाही अन्‌ गावातून बाहेर पडणार नाही, गेलेच तर पुरेपूर काळजी घ्यावी, याची दक्षता घेतानाच गावातही एकमेकांना संसर्ग होणार नाही, याची दक्षता स्थानिक प्रतिनिधींनी घेतली. आरोग्य विभागाचे मार्गदर्शन यासाठी मोलाचे ठरले.

ग्रामीण भागात आरोग्य विभाग व ग्रामसेवकांनी स्थानिक पातळीवर मार्गदर्शन, निर्बंधाचे काटेकोर पालन, रुग्ण विलगीकरण, तसेच सर्वेक्षण व उपचार या पातळीवर काटेकोरपणे काम केले. मीदेखील गावोगावी जाऊन कर्मचाऱ्‍यांना मार्गदर्शन करत होतो. सीईओ लीना बनसोड यांनीदेखील सर्व सरपंचांना मार्गदर्शन केले. -उमेश देशमुख, गटविकास अधिकारी, येवला

हेही वाचा: प्रतिपूर्ती अनुदान रखडल्याने RTE प्रक्रियेवर बहिष्कार?

...असे आहेत आकडे

प्रकार - शहर - तालुका

एकूण रुग्ण - १,३५३ - ३,९७२

बरे झालेले - १,२८९ - ३,७४१

मृत्यू - ५३ - १७३

सध्या ॲक्टिव्ह - ११ - ५८

सध्या कन्टेन्मेंट झोन - १६ - १२२

सर्वेक्षण लोकसंख्या - १९,२१२ - ६७,२९२

हेही वाचा: नाशिक विभागात ९६ टक्क्यांवर रुग्णांची कोरोनावर मात

loading image