esakal | कमालच! स्कोर १५, रेमडिसिव्हीर अन् ऑक्सिजनशिवाय आजोबांची कोरोनावर मात

बोलून बातमी शोधा

khamkheda aaher
कमालच! स्कोर १५, रेमडिसिव्हीर अन् ऑक्सिजनशिवाय आजोबांची कोरोनावर मात
sakal_logo
By
खंडू मोरे

खामखेडा (जि.नाशिक) : देशभरात ऑक्सिजन अन् रेमडेसिव्हिरचा तुटवडा, राज्यकर्तेदेखील हवालदिल. या दोन गोष्टींअभावी होणारे मृत्यू. एकूणच भयावह परिस्थिती निर्माण झालेली असताना वयाच्या ८२ व्या वर्षी कोरोनाने त्यांना गाठले. . विशेष म्हणजे रेमडेसिव्हिर किंवा कृत्रिम ऑक्सिजनची मदत न घेता ते ठणठणीत बरे झाले आहेत. वीस-पंचवीस दिवसांत ते शेतात फेरफटकादेखील मारू लागले आहेत. त्यांनी कशी केली कोरोनावर मात?

एकाच घरातील दहा कुटुंबीयांचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह

खामखेडा येथील ८२ वर्ष वय असलेल्या प्रगतिशील शेतकरी कडू आहेर यांनी ५ मार्चला लस घेतली. या लसीचा त्यांना कुठलाही त्रास झाला नाही. त्यात नकळत आजोबांना कोरोनाची लक्षण दिसून आली. कुटुंबीयांनी कुठलाही उशीर न करता त्यांची चाचणी केली. अहवाल पॉझिटिव्ह आला. एचआरसीटी केल्यावर त्यांचा स्कोर १५ असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. आजोबांचे तीन मुले, चार सुना, एक नातसून, एक नातू व एक पणतू अशा एकाच घरातील दहा कुटुंबीयांचा अहवालही कोरोना पॉझिटिव्ह आलेला होता.

हेही वाचा: मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

आठ दिवसांत आजोबा ठणठणीत बरे

मात्र आजोबांचा आत्मविश्वास कुटुंबीयांना आधार देणारा ठरला. पाच दिवस आजोबांनी दवाखान्यात उपचार घेतल्यावर गृहविलगीकरणात राहण्याचा आग्रह धरला. काही दिवस त्यांनी विलगीकरणात राहून घरीच उपचार घेतले. इतर कुटुंबीयांनाही आधार दिला. आठ दिवसांत आजोबा ठणठणीत बरे झाल्याने इतर कुटुंबीयांचा आत्मविश्वास वाढला. यामुळे पूर्ण घर कोरोनामुक्त झाले. आज सर्व कुटुंबीय शेती व्यवसाय असल्याने शेतात नित्यनियमाने काम करत आहेत. कोरोनावर मात करत या कुटुंबीयांनी सात हजार क्विंटल उन्हाळ कांदा काढत कांद्याची सध्या साठवणूक करत आहेत.एचआरसीटी स्कोर १५, यापूर्वीच झालेले लसीकरण अन् वेळीच उपचार मिळाल्यामुळे खामखेडा येथील कडू सखाराम आहेर यांनी कोरोनावर अवघ्या आठ दिवसांत मात केली

हेही वाचा: 5 वेळा हृदयविकाराचा झटका, मधुमेह असूनही 92 वर्षीय आजोबांचा लढा यशस्वी!

लस घेणे सुरक्षितच

घरात एकूण ११ कुटुंबीयांना कोरोनाची लागण झालेली असताना आजोबा व त्यांच्या पत्नी रखमाबाई (वय ७८) यांचे लसीकरण झाले होते. यामुळे आजोबांनी अल्पावधीतच कोरोनावर मात केली. आजींना संसर्ग झाला नाही. त्यामुळे लस घेणे अगदी सुरक्षित असल्याची भावना तयार होण्यास आहेर कुटुंबीयांचा अनुभव कामी आला आहे.

''कोविड झाला तरी लस आपल्याला मृत्यूपासून दूर ठेवते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आमचे वडील. संपूर्ण कुटुंबीय बाधित झाल्याने आम्ही हतबल होतो. मात्र वडिलांनी आम्हा सर्वांना आधार दिला. हीच आमची सकारात्मक ऊर्जा ठरली''.- समाधान आहेर, मुलगा