esakal | मरायचे असेल तर अकराच्या आत! आता मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik News

मरायचे असेल तर अकराच्या आत! शहरात मृताचा शेवटचा प्रवासदेखील खडतर

sakal_logo
By
युनूस शेख

जुने नाशिक : कोरोना असो वा नैसर्गिकरीत्या मृत्यू होण्याचे प्रमाण, सद्या शहरात अधिकतेने वाढले आहे. यात अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य विक्रीचे दुकान लॉकडाउनमुळे बंद ठेवण्यात येत आहे. केवळ सकाळी अकरापर्यंत दुकान उघडे ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे मरायचे असेल सकाळी अकराच्या पूर्वीच, त्यानंतर अंत्यविधीचे साहित्य मिळणे अवघड झाले आहे. यात मृताच्या आप्तस्वकीयांची धावाधाव होत असून, मृताचा शेवटचा प्रवासदेखील शहरात आता खडतर झाला आहे.

अंत्यसंस्कार तरी सुखकर होणे आवश्‍यक

हिंदू संस्कृतीनुसार एखाद्या मृत व्यक्तीस मोक्ष प्राप्तीसाठी त्यांचे पारंपरिकरीत्या आणि आवश्‍यक धार्मिक विधीसह अंत्यसंस्कार झाले पाहिजे, अशी परंपरा, प्रथा आहे. कोरोनाच्या संकटामुळे मात्र तसे होत नसल्याचे चित्र आहे. कोरोनाबाधिताचा मृत्यू झाल्यास त्याचा मृतदेह कुटुंबीयांकडे न सोपवता महापालिका कर्मचाऱ्यांकडून थेट अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी नेला जातो. मृतदेह प्लॅस्टिकच्या आवरणात पॅक असतो. त्यावरच त्याचा अंतिमसंस्कार होत असतो. अशा मृतदेहांच्या नशिबी कुठला विधी आणि काय, अशी परिस्थिती आहे. मात्र ज्यांचे नैसर्गिक किंवा अन्य कुठल्या कारणाने मृत्यू होत आहे त्यांचे अंत्यसंस्कार तरी सुखकर होणे आवश्‍यक आहे. त्यांचाही शेवटचा प्रवास खडतर झाला आहे.

हेही वाचा: होम क्वारंटाईन कोरोनाबाधितांसाठी ‘आयएमए’तर्फे ‘नाशिक कोविड हेल्पलाइन’

कुटुंबीयांकडून नाराजी..

मोक्ष प्राप्तीसाठी धार्मिक विधी केले जातात. त्यासाठी पूजाविधी आणि अंत्यसंस्काराचे साहित्यांची आवश्‍यकता भासत असते. मिनी लॉकडउनमुळे भद्रकाली परिसरातील अशा प्रकारचे साहित्य विक्रीचे दुकाने बंद राहत असल्याने अनेकांना साहित्य मिळत नाही. काहींच्या कुटुंबीयांकडून विविध मार्गाने ते प्राप्त करण्याचा प्रयत्न केला जातो. काहींना साहित्यांअभावीच अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त होत असते. शिवाय विक्रेत्यांचे देखील आर्थिक नुकसान होत आहे. व्यक्तीचा मृत्यू होण्यास कुठला वेळ, काळ नसतो. मग अंत्यसंस्कार साहित्य विक्रीच्या दुकानांना वेळेचे बंधन का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सध्या अकरापर्यंतच विक्रेत्यांना दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. याचा अर्थ कुणास मरायचे असेल तर त्यांनी अकराच्या आतच मरणे अनिवार्य अन्यथा पारंपरिकरीत्या धार्मिक विधीसाठी साहित्य मिळणे अवघड होणार आहे. अंत्यविधी साहित्याच्या दुकानांवर कुणी फिरण्यास येत नाही. कुणी मृत झाले तर त्याचे एक किंवा दोन नातेवाईकच साहित्य खरेदीस येत असतात. अशा वेळेस गर्दी होण्याची शक्यता उद्‍भवत नाही. मग त्यांच्यावर बंदीचे नामुष्की का, असे प्रश्‍न मृतांच्या कुटुंबीयांकडून उपस्थित केले जात आहेत.

ऑन कॉल साहित्याची विक्री

अंत्यविधीचे साहित्य खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना दुकान बंद दिसले, की त्यांच्याकडून दुकानावर असलेला मोबाईल क्रमांकवर संपर्क केला जातो. विक्रेते तितक्या वेळेत येऊन त्यांना साहित्य देतात. अशा वेळेसही त्यांना कारवाईस सामोरे जावे लागते. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी येथील एका विक्रेत्याने चक्क होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यास फोन आला, की त्या विक्रेत्यांकडून परिसरात रिक्षाचालकाकडे साहित्य देऊन संबंधित ठिकाणी साहित्य पोच केले जाते. ग्राहक ‘फोन पे’द्वारे त्याचे पैस पेड करत असतो.

हेही वाचा: 5 वेळा हृदयविकाराचा झटका, मधुमेह असूनही 92 वर्षीय आजोबांचा लढा यशस्वी!

अंत्यविधी साहित्य विक्री अत्यावश्‍यकमध्ये येते. प्रशासनाने नियम आणि अटी-शर्तीवर दुकान उघडण्यास परवानगी द्यावी.

-मतीन अत्तार, विक्रेता

loading image