
Inspirational Story: आजारावर मात करत आजींकडून सप्तरंगांची उधळण!
नाशिक : सिडकोतील दिलासा केअर सेंटरमधील ८४ वर्षांच्या नलिनी नाईक यांनी आजारावर मात करत सप्तरंगांची उधळण करण्यास सुरवात केली. त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन २५ आणि २६ फेब्रुवारीला सिडकोतील महाराणा प्रताप चौकातील दिलासा सेंटरमध्ये ‘नलिनीज आर्ट' या नावाने होत आहे. (84 year old Nalini Ajji overcome disease and draw colourful paintings inspirational story nashik news)
नलिनी आजी मूळ मुंबईच्या असून, अडीच वर्षांपूर्वी त्या दिलासामध्ये दाखल झाल्या. अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांचा उजवा हात आणि पाय काम करत नव्हते. आजीचा उत्साह मोठा होता. भगव्या रंगांची वस्त्रे परिधान केलेल्या आजीच्या पलंगावर सप्तरंगांची उधळण करणारी चित्रे आकर्षित करतात.
निसर्ग आणि धार्मिक विषयावरील चित्रे त्यांनी साकारली आहेत. आजींनी गेल्या वीस वर्षांपासून ब्रश हातात घेतला नव्हता. दिलासा सेंटरच्या अध्यक्ष उज्वला जगताप यांनी आजींना प्रोत्साहित करत त्यांच्या हातात ब्रश दिला.
त्यांचा उजवा हात काम करत नव्हता. पण कला माणसाला जगायला शिकवते याचे उदाहरण आजी बनल्या आहेत. चालता येत नसल्याने सेंटरमधील पलंग हेच त्यांच्यासाठी चित्र साकारण्याची जागा बनली.
पेन्सिल, ब्रश आणि रंगांचे कंपास हे साहित्य त्यांच्या पलंगावर दिसते. स्वतः मनाने त्या चित्रे साकारतात. संत, पक्षी आणि प्राण्यांची चित्रे काढायला त्यांना आवडते. चित्रकलेसोबत आजी रांगोळी, पाककला, विणकाम, भरतकाम आदींमध्ये पारंगत आहेत. त्या भजन छान म्हणतात. आजीचे बालपण मुंबईमध्ये गेले.
हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!
त्यांनी विवाह केला नाही. त्यांची एक बहीण नाशिकमध्ये राहते. कुणाला त्रास नको म्हणून आजी सेंटर मध्ये राहतात. आजींनी मुंबईमध्ये सर जेजे स्कूल ऑफ आर्ट मधून जेडी फाईन आर्टचे शिक्षण घेतले. निर्मला निकेतनमध्ये त्या चित्रकलेच्या शिक्षक होत्या.
मुंबई महापालिकेने त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. प्रदर्शनात आजींची चित्रे मग, टी कोस्टर, रायटिंग पॅडवर प्रिंट केली असून ती विकत घेता येतील.
तसेच शनिवारी (ता. २५) सायंकाळी साडेचारला सोनाली जोशी यांची रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी मंडला आर्टची कार्यशाळा होईल. रविवारी (ता. २६) सकाळी अकराला अंकित शर्मा यांचे ‘चारकोल पेंटिंग'वर ‘लाइव्ह डेमो‘ होईल.