नाशिक : NMCचे 93 टक्के कर्मचारी प्रामाणिक; शिस्तबद्ध कामाचे मोठे उदाहरण

NMC Latest Nashik news
NMC Latest Nashik newsesakal

नाशिक : नागरिकांचा दैनंदिन जीवनाशी निगडित संपर्क येतो, तो महापालिकेशी. जन्मापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत अन् रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, आरोग्यापर्यंतच्या सेवा महापालिका देते. राज्यातील अग्रगण्य महापालिकेत नाशिक महापालिकेचा समावेश होतो.

पण सरकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालय म्हटले, की नागरिकांमध्ये नकारात्मक भाव असतो. प्रत्यक्षात मात्र महापालिकेच्या दृष्टीने सकारात्मक भाव वृद्धिंगत करणारी बाब आहे, ती म्हणजे, महापालिकेचे ९३ टक्के कर्मचारी प्रामाणिक असल्याची नोंद दैनंदिन हजेरीतून होते. शिस्तबद्ध कामाचे हे मोठे उदाहरण आहे. (93 percent of NMC employees honest Great example of disciplined work Nashik Latest Marathi News)

कागदोपत्री अथवा तपासणीत ७ टक्क्यांपैकी एखादा आढळल्यास त्याला शिक्षा होते. गटर-वॉटर-मीटर या तीन गोष्टींवर लक्ष देण्याचे काम प्रामुख्याने महापालिकेचे आहे. महापालिकेत कार्यरत असलेला कर्मचारी जितका सक्षम तितके कामाचे नियोजन अचूक. एकूण साडेआठ तासांच्या ड्यूटीमध्ये किती वेळ कामावर हजर राहतात, यावर कामाची गती व गुणवत्ता अवलंबून राहते.

महापालिकेत सात हजार ९२ कर्मचारी पहिल्या आकृतिबंधात होते. त्यातील दोन हजार ५०४ कर्मचारी निवृत्त अथवा अन्य कारणांमुळे सेवेतून पायउतार झाले. चार हजार ५८८ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर महापालिकेचा गाडा चालविण्याचे काम आहे. काम करताना हजेरीची नोंद घेतली जाते. २०१६ पूर्वी मॅन्युअल पद्धतीने म्हणजे रजिस्टरमध्ये स्वाक्षरीच्या माध्यमातून नोंद घेतली जात होती; परंतु हजेरीच्या पारंपरिक पद्धतीत अनेक गमतीजमती दिसून आल्या.

महिनाभराची हजेरी एकदाच लावणे, हजेरीची नोंद घेण्यासाठी चिरीमिरी, हजेरी लावल्यानंतर गायब होऊन दुसऱ्या दिवशी प्रकट होणे याचा परिणाम पुरेशी संख्या असूनही कामकाजाला गती मिळत नव्हती. त्यामुळे २०१६ मध्ये आधुनिक पद्धतीचा अवलंब करत बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा निर्णय तत्कालीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी घेतला.

सुरवातीला ‘कार्ड पंचिंग’ होते, परंतु परस्पर कार्ड पंचिंग करण्याचा फंडा अवलंबला गेल्याने ‘थम पंचिंग’ आणल्याने ‘इन’ व ‘आउट’ अशा दोन्ही ‘पंचिंग’साठी कर्मचाऱ्यांना स्वतः मशिनसमोर उभे राहण्याशिवाय पर्याय नाही. त्याचा परिणाम असा झाला, की हजेरी लावल्यानंतर गायब होण्याचे प्रमाण घटले. त्याशिवाय कर्मचारी कमतरता असल्याने कामाचा भार वाढला.

अधिकाऱ्यांना कामासंबंधी उत्तर देणे असल्याने कार्यालयात बसून काम पूर्ण करण्याशिवाय पर्याय नाही. या सर्वांचा परिणाम कामकाजाला गती मिळाली. ‘थम पंचिंग’मुळे नकळत ९३ टक्के कर्मचाऱ्यांना हजेरीच्या बाबतीत प्रामाणिकेचे प्रमाणपत्र मिळाले आहे.

हजेरीच्या बाबतीत अप्रामाणिक असलेला ७ टक्के वर्गाकडे लक्ष केंद्रित केले जाते, परंतु कर्मचाऱ्याची कमतरता, रिक्त पदांचा वाढता ‘बॅकलॉग’, कामाचा वाढता ताण लक्षात घेता प्रशासनाकडून आता सातऐवजी नियमित हजेरी लावून काम करणाऱ्या ९३ टक्के वर्गाकडे लक्ष देऊन सकारात्मक वातावरणनिर्मिती केली जात आहे. भविष्यात ९३ टक्क्यांच्या प्रवाहात ७ टक्के येतील, असा विश्‍वास प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

७ टक्क्यांचे समर्थन

सात टक्के कर्मचारी ‘थम पंचिंग’बाबत निष्काळजी असल्याचे कागदोपत्री दिसत असले, तरी प्रशासन मात्र त्यांच्या बाजूने उभे आहे. सात टक्क्यांमध्ये अभियंत्यांचे प्रमाण अधिक आहे. ‘फील्ड’वर जावे लागत असल्याने त्यांना ‘पंचिंग' बंधनकारक नसल्याचा दावा केला जातो; परंतु सर्वच अभियंत्यांना ‘फील्ड’वर जाण्याचा भत्ता मिळतो अथवा महापालिकेचे वाहन असते. त्यामुळे मुख्यालयात अथवा कामाच्या ठिकाणी ‘पंचिंग’ करून फील्डवर जाता येते.

NMC Latest Nashik news
Nandurbar : अष्टविनायक यात्रा बससेवा आता 20 सप्टेंबरला

'फेस रीडिंग’ची वाढती व्याप्ती

‘थम पंचिंग’ऐवजी आता ‘फेस रीडिंग’चा नवा प्रकार आला आहे. चेहरा अथवा डोळे ‘स्कॅन’ करून हजेरी नोंदवली जाते. ‘थम पंचिंग’पेक्षा अधिक अचूकता या तंत्रज्ञानात असल्याने ७ टक्क्यांचा ‘बॅकलॉग’ भरून काढण्यासाठी महापालिका प्रशासन त्यावर विचार करत आहे.

विभागनिहाय कर्मचारीसंख्या

विभाग कर्मचारीसंख्या
मुख्यालय ७३२
पूर्व ४१२
नाशिक रोड ९३४
पश्‍चिम ३६५
सिडको ६४७
पंचवटी ९०६
सातपूर ५८९
---------------------------------
एकूण ४,५८८

एकाचे दुसरे चांगले आचरण
यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतसे जन:।
स यत्प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते।।

(भगवद्‍गीतेमधील तिसऱ्या अध्यायातील २१ वा श्‍लोक)

अर्थात, चांगले आचरण करून एखादी व्यक्ती काम करत असल्यास दुसरी व्यक्ती तसे चांगले आचरण करून काम करते. चांगले आचरण करणाऱ्या व्यक्तीमुळे मानवी जनसमूह ते आचरण करतो. मुळातच, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यक्षमता हा चर्चेचा विषय राहिला आहे. अशा परिस्थितीत एक गोष्ट चांगली म्हणजे, वेळेत कार्यालयात यावे आणि जावे. त्यातून शिस्तबद्ध कार्यालयीन वातावरण तयार होण्यास मदत झाल्याचे नाशिक महापालिकेत आपणाला पाहावयास मिळते.

भगवद्‍गीतेमधील सुविचार

० कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो.
० जेव्हा माणूस त्याच्या कामात आनंद शोधतो, तेव्हा त्याला पूर्णत्व येते.
० स्वतःच्या आयुष्यात आहे, तसे प्रामाणिकपणे जगणे, हे दुसऱ्यांची नक्कल करत जगण्यापेक्षा लाखमोलाचे आहे.

"नियमित हजेरी लावणारे जवळपास ९३ टक्के कर्मचारी आहेत. पाच ते सात टक्के कर्मचाऱ्यांची हजेरी नियमित नसली, तरी त्यांच्याकडे ‘फील्ड वर्क’ आहे. बहुतांश अभियंते सकाळी ‘साइट व्हिजिट’ करून कामावर येतात. त्यामुळे १०० टक्के ‘पंचिंग’ शक्य नाही; परंतु सकारात्मकदृष्टीने विचार केल्यास ९३ टक्के ही आकडेवारी मोठी आहे."

- मनोज घोडे-पाटील, महापालिकेच्या प्रशासन विभागाचे उपायुक्त

NMC Latest Nashik news
Nashik : अभियांत्रिकी दिनानिमित्त प्रवरा शिक्षण संस्थेत नेत्र तपासणी शिबिर

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com