Latest Marathi News | हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; आशापीर बाबा देवस्थानचा यात्रोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ashapir baba sinnar nashik

हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक; आशापीर बाबा देवस्थानचा यात्रोत्सव

सिन्नर (जि. नाशिक) : हिंदू-मुस्लीम धर्मीय बांधवांच्या ऐक्याचे प्रतीक असलेल्या सिन्नर तालुक्यातील घोटेवाडी येथील आश्विनाथ तथा आशापीर बाबा देवस्थानचा यात्रोत्सव गुरुवारी (दि. १८) होत आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे (Corona) यात्रोत्सव बंद होता. दोन वर्षानंतर यंदा यात्रा भरणार असल्याने भाविकांच्या गर्दीचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. (Latest Marathi News)

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर पारेगाव आणि घोटेवाडी या दोन गावांच्या सीमेवर हे देवस्थान वसले आहे. जागृत व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या या देवस्थानच्या दर्शनासाठी प्रत्येक गुरुवारी राज्यभरातील भाविक येतात. श्रावण महिन्यातील तिसर्‍या गुरुवारी आश्विनाथ गडावर एकदिवसीय यात्रोत्सव भरतो. लाखो भाविक या यात्रेत हजेरी लावतात. दरवर्षी राज्यातील हिंदू तसेच मालेगाव, कल्याण, भिवंडी, औरंगाबाद आदी राज्यातील वेगवेगळ्या भागातून मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव या देवस्थान स्थळी हजेरी लावून दर्शन घेतात.

हेही वाचा: 'रेवडी‘ची व्याख्या ठरवा, आम्ही तसा निर्णय करू; सुप्रीम कोर्टाची सूचना

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे भाविकांना दर्शनाचा लाभ घेता आला नाही. यावेळी मात्र यात्रा खुली झाल्याने भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतील असा अंदाज आहे. संगमनेर तालुका पोलिस स्टेशनच्या वतीने यात्रास्थळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भाविकांसाठी बससेवा

राज्य परिवहन महामंडळाने भाविकांसाठी वावी तसेच निमोण येथून बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. यात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन घोटेवाडीच्या सरपंच मंजुश्री घोटेकर, उपसरपंच रंजना घोटेकर, सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान घोटेकर, सोसायटीचे चेअरमन सुकदेव वैराळ यांच्यासह यात्रा कमिटीने केले आहे.

हेही वाचा: सावरकर पोस्टर वादावर इतिहासतज्ज्ञ विक्रम संपथ यांचा संताप; म्हणाले..

श्रावणात बोकडबळी बंद...
अशापीरास नवसपूर्तीसाठी बोकड बळी देण्याची प्रथा आहे. वर्षभर सर्वधर्मीय भाविक गडावर येऊन नवसपूर्ती करत असतात. मात्र, हिंदूंचा पवित्र महिना असलेल्या श्रावण महिन्यात तसेच यात्रेच्या वेळी बोकड बळी देणे सर्वजण टाळतात. केवळ गोड भाताचा तसेच भाजी पोळीचा नैवेद्य या काळात दाखवला जातो. श्रावणात संपूर्ण डोंगर हिरवाईने नटलेला असतो. यात्रेच्या दिवशी दिवसभर कोसळणाऱ्या श्रावणसरींनी वातावरण आल्हाददायक बनते.

Web Title: A Symbol Of Hindu Muslim Unity Asha Pir Baba Devasthan Yatra Festival Sinnar Nashik

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..