नाशिक : भावेंच्‍या भूमिकेपासून ‘आप’ने केला किनारा; पक्षाकडून घरचा आहेर | Nashik Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

aap

भावेंच्‍या भूमिकेपासून ‘आप’ने केला किनारा; पक्षाकडून घरचा आहेर


नाशिक : काही दिवसांपूर्वी आम आदमी पक्षाचे (Aam Adami Party) प्रवक्‍ते जितेंद्र भावे (Jitendra Bhave) यांनी महापालिकेतील शिक्षण विभागाच्‍या प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांच्‍या दालनाबाहेर आंदोलन केले होते. यादरम्‍यान वापरलेल्‍या अपशब्‍दांबाबत पक्षाने प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. कुठल्‍याही महिलेचा अवमान करणे हे पक्षाचे धोरण नसून, भावे यांचा तो वैयक्‍तिक विषय असल्‍याचे पत्रकात नमूद केले आहे. या प्रकरणातून पक्षाने स्‍वतःला बाजूला केले आहे. पक्षाकडूनच विरोधात पत्रक जारी केल्‍याने भावे यांना घरचा आहेर मिळाल्‍याची चर्चा आहे.

यासंदर्भात आप पदाधिकाऱ्यांनी स्‍वाक्षरी करत निवेदन जारी केले आहे. त्यात म्‍हटले आहे, की आम्‍ही आम आदमी पक्षाच्या स्थापनेपासूनचे जुने कार्यकर्ते, आजी- माजी पदाधिकारी आहोत. २१ डिसेंबरला राजीव गांधी भवन येथे जितेंद्र भावे यांनी अधिकारी सुनीता धनगर यांच्‍याबाबत अपशब्द उच्चारला. या वेळी उपस्‍थित सहकाऱ्यांनी शब्‍द सांभाळून बोलायलाही सूचविले. तरीही भावेंनी पुन्हा एकदा अपशब्द वापरले. त्यांनतर प्रवेशद्वारावरही फेसबुक लाईव्‍ह करताना हातवारे करत अर्वाच्य भाषेत महिला अधिकाऱ्याविषयी भाषा वापरली. त्यापुढे जाऊन भावे म्हणाले, की ‘गाठ जितेंद्र भावे आणि आम आदमी पक्षा’शी आहे. आम आदमी पक्ष तुम्हाला संवैधानिकरित्या जाम करेल. मात्र, आम आदमी पक्षाने या विधानापासून या प्रसिद्धीपत्रकातून किनार केली आहे.

हेही वाचा: आरोग्य सेवांच्या बाबतीत केरळ देशात अव्वल; उत्तर प्रदेश सर्वात वाईट

भूमिका स्‍पष्‍ट करताना म्‍हटले आहे, की अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेवर, भ्रष्टाचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे, त्यांना जाब विचारणे यात गैर नाही. मात्र हे करताना महिला अधिकाऱ्याच्या शील व अब्रूवर शिंतोडे उडतील, असे अपशब्द उच्चारणे निंदनीय आहे. शिक्षणाधिकारी श्रीमती धनगर यांच्याशी शिक्षणाच्या मुद्यावर, कार्यशैलीबाबत आमचे मत-मतांतरे आहेतच. मात्र, भावेंनी त्‍यांच्‍याविषयी काढलेले अपशब्‍द निंदनीय आहेत. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. त्यांचे शब्द असंवैधानिक आहेत. जाहीररित्या आम आदमी पक्षातर्फे श्रीमती धनगर यांची माफी मागतो. भावे जरी पक्षाचे प्रवक्ते असले, तरीही महिलांविषयी अपशब्द काढणे, ही पक्षाची भूमिका असू शकत नाही.

तेही कारण वैयक्‍तिक

या घटनेवेळी भावे जी. रमेश नामक व्यक्तीलासोबत घेऊन कार्यालयात गेले होते. याभेटीदरम्‍यान त्‍यांनी केलेली मागणी ही वैयक्‍तिक स्‍वरूपाची आहे. व त्‍याचा पक्षाशी काहीही संबंध नसल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे. आम्ही सर्वजण अरविंद केजरीवाल यांच्या व्यवस्था परिवर्तनाच्या लढ्यात सामील आहोत. इतर कोणाच्या व्यक्तिगत मुद्द्यांना अथवा विचारांना आपण पक्षाचे म्हणणे समजू नये, असेही पत्रकात नमूद केले आहे. शहराध्यक्ष गिरीश उगले-पाटील, माजी शहराध्यक्ष बंडूनाना डांगे, ॲड. प्रभाकर वायचाळे, स्‍वप्‍नील घिया, ॲड. अभिजित गोसावी, अनिल कौशिक आदींच्‍या पत्रकावर स्‍वाक्षऱ्या आहेत.

हेही वाचा: Children's Vaccination : CoWIN वर रजिस्ट्रेशन कसे करावे? जाणून घ्या

Web Title: Aap Party Has Announced That Its Policy Is Different From That Of Jitendra Bhave Nashik Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikAap party
go to top