नाशिक-‘गुलाबी हवे’च्या हलक्याशा लहरीवर स्वार होऊन ठसकेबाज ऐटीत ‘ऐका दाजिबा’ यावा आणि ‘कळत-नकळत’, ‘आभास हा’ निर्माण करीत त्याने कायमचा ‘काळजात मुक्काम’ करावा, अशी अनुभूती नाशिककर रसिकांना दिली, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांनी! निमित्त होते, ‘सकाळ माध्यम समूह’ आयोजित वैशाली सामंत ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’चे. त्र्यंबक रोड येथील हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर शनिवारी (ता.१५) चंद्राच्या साक्षीने रंगलेल्या या संगीतमय प्रवासात हिंदी-मराठी गाण्यांनी नटलेल्या संगीत मैफलीला दिलखुलास दाद देत रसिकांनी मनमुराद आनंद लुटला.