esakal | Nashik : मुख्य बाजारपेठेत ‘स्मार्ट’ कामांना गती
sakal

बोलून बातमी शोधा

NASHIK

मुख्य बाजारपेठेत ‘स्मार्ट’ कामांना गती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या मेनरोड परिसरातील धुमाळ पॉइंट ते नेहरू चौकापर्यंतच्या स्मार्टसिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांना काहीशी गती मिळाली आहे. परिसरातील व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. शिवाय दिवाळीच्या पूर्वी कामे पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे.

गेल्या सुमारे नऊ महिन्यांपासून धुमाळ पॉइंट ते नेहरू चौकापर्यंत स्मार्टसिटीअंतर्गत विविध प्रकारची कामे सुरू आहे. अतिशय संथगतीने कामे सुरू असल्याने परिसरातील व्यावसायिकांवर त्याचा परिणाम झाला होता. शिवाय अवघ्या काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली आहे. नागरिकांना खरेदी करताना कामांची अडचण येऊ नये, याचा परिणाम व्यवसायावर होऊ नये, यासाठी त्रस्त व्यावसायिकांकडून कामे लवकर पूर्ण करण्याची मागणी केली होती. त्यांच्याकडून आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला होता.

याची दखल घेत शिवसेना शिष्टमंडळाकडून काही दिवसांपूर्वी कामाची पाहणी करण्यात आली. सुरू असलेल्या कामासंदर्भात नाराजी व्यक्त केली. महापालिका आयुक्त यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. त्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव, तसेच स्मार्टसिटी विभागाचे अधिकाऱ्यांची बैठक झाली.

आयुक्तांनी केलेल्या सूचनेनंतर येथील कामांना गती आली आहे. दिवस- रात्र कामे सुरू आहेत. धुमाळ पॉइंट ते प्रकाश सुपारीपर्यंतच्या रस्त्याचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. त्या पुढील रस्त्याचे कामदेखील गतीने सुरू आहे. दहीपूल परिसरातदेखील कामाचा जोर वाढला आहे. रात्रंदिवस काम सुरू असल्याने परिसरातील व्यापाऱ्यांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यापुढेही कामाची अशा प्रकारची गती राहून दिवाळी सीझन सुरू होण्यापूर्वी येथील रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे. जेणेकरून बाजारपेठ खुली होऊ शकेल. नागरिकांना खरेदीसाठी याठिकाणी येण्यास अडचण भासणार नाही. त्यामुळे परिसरातील व्यावसायिकांचाही व्यवसाय तेजीत येऊ शकेल.

loading image
go to top