कारची मालवाहू वाहनाला
जोरदार धडक; चालक गंभीर
कानळदा-जळगाव रस्त्यावरील अपघात
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. ६ : समोरून भरधाव येणाऱ्या कारने मालवाहू वाहनाला जोरदार धडक दिल्याने वाहनचालक गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (ता. ३) दुपारी सव्वादोनच्या सुमारास कानळदा-जळगाव रस्त्यावरील पेट्रोलपंपाजवळ घडला. अपघातानंतर जखमी चालकाला मदत न करताच कारचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी गुरुवारी (ता. ६) तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इब्राहीम रहीम पिंजारी (वय ३६, रा. डी. मरियम पार्क, शिवाजीनगर, जळगाव) हे मालवाहू वाहन (एमएच १९ बीएम १९०४) घेऊन कानळदा येथून जळगावकडे येत होते. कानळदापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पेट्रोलपंपाजवळ समोरून येणाऱ्या कारने (एमएच ०५ सीए ३१२३) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या धडकेत इब्राहीम पिंजारी यांच्या दोन्ही हातांना, उजव्या पायाला तसेच छाती व कंबरेला गंभीर दुखापत झाली. अपघातात मालवाहू वाहनाचेही मोठे नुकसान झाले.
कारचालक पसार
दरम्यान, अपघातानंतर कारचालक जखमी पिंजारी यांना कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून निघून गेला. अपघाताचा आवाज ऐकून प्रत्यक्षदर्शींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी पिंजारी यांना वाहनातून बाहेर काढून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी जखमीचे भाऊ सलमान रहीम पिंजारी (वय ३८, रा. मरीयम पार्क) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कारचालकाविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे तपास करीत आहेत.