esakal | 'इफ्तार पार्टी' बंदीने इच्छुकांचा हिरमोड! प्रचाराची संधी हुकल्याने नाराजी
sakal

बोलून बातमी शोधा

Iftar party

'इफ्तार पार्टी' बंदीने इच्छुकांचा हिरमोड! प्रचाराची संधी हुकल्याने नाराजी

sakal_logo
By
- युनूस शेख

जुने नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रभावाने सामुदायिक इफ्तार पार्टीवर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे. आगामी महापालिका निवडणुकांमध्ये इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचा यामुळे हिरमोड झाला आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून त्यांना प्रचारास मिळणारी संधी हुकल्याने त्यांच्या नाराजी पसरली आहे.

महापालिका निवडणुका फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता आहे. इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. रमजान पर्वात होणारी इफ्तारपार्टी त्यांच्यासाठी एक चांगली संधी चालून आली होती. प्रशासनाकडून सर्व प्रकारचे धार्मिक सामुदायिक कार्यक्रम रद्द केले आहे. दरवर्षी सामाजिक संस्था, पोलिस विभाग तसेच राजकीय पक्षांकडून इफ्तारपार्टी उत्साहात साजरी केली जाते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमावर बंदी असल्याने इफ्तारपार्टी होणे शक्य नाही. इच्छुकांकडून लॉन्स, हॉटेल अशा विविध ठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाते. एकाच छताखाली अनेक उमेदवारांना भेटून आपण आगामी निवडणुकांमध्ये इच्छुक असून इतरांपेक्षा कसे योग्य आहोत, हे पटवून देता येणार नसल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. इतकेच नव्हे तर रमजान ईदनिमित्त इच्छुकांकडून मतदारांच्या कुटुंबीयांची भेट घेणे, त्यांच्याशी संपर्क करत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, अशा विविध प्रकारची कामे या काळात करता येणार नाही. मशीदही बंद असल्याने त्यांचा तोही प्रयत्न फसला आहे. एक गट्टा मतदारपर्यंत जाण्यासाठी पार्टी आणि मशीद दोन्ही पर्यायांच्या चांगल्या संधीस मुकावे लागण्याची वेळ इच्छुकानावर आली आहे.

हेही वाचा: एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी

ईदची संधी हुकणार

गोल्फ क्लब येथे रमजान ईदची सामुदायिक नमाज पठाण होत असते. यावर्षीदेखील सामुदायिक ईदची नमाज पठण करण्यावर कोरोनामुळे बंदी आहे. दरवर्षी ईदच्या नमाज दरम्यान विविध पक्षाचे पदाधिकारी आमदार खासदार यांच्याकडून गोल्फक्लब येथे उपस्थिती दर्शवून शहर-ए-खतीब तसेच मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या जातात. असे करून आपण त्यांच्या बरोबर असल्याचे भासवले जाते. यावर्षी मात्र त्यांना तसे करता येणार नाही. पार्टी बरोबरच ईदच्या नमाजनिमिताने मतदारांपर्यंत पोहचण्याची संधी हुकणार आहे.

हेही वाचा: सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा