esakal | एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : रुग्णांना बेड नाही, उपचाराला कर्मचारी नाही, अशाही स्थितीत वाढत्या कोरोनाच्या साथरोगामुळे अव्वाच्या सव्वा बेडला मान्यता दिल्यानंतर आता उपचार होत नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर लढाई लढणाऱ्या महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील अव्यवस्थेतून कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होऊ लागल्याचे पुढे येत आहे. अशाच एका हतबल कुटुंबाने आठ दिवसांत घरातील तिघे कर्ते पुरुष गमावले. त्यामुळे सोयी-सुविधा नसताना बेडची संख्या वाढवत उपचाराचे ‘स्टंट’चे गंभीर दुष्परिणाम पुढे येऊ लागले आहेत. त्याची जबाबदारी कुणावर निश्चित करायची? हा कळीचा मुद्दा आहे.

आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे..!

खासगी रुग्णालयाचे उपचार परवडत नाहीत. महापालिकेच्या सरकारी रुग्णालयात उपचाराला कर्मचारी नाही. त्यामुळे नाशिक रोडला एका गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबाची फरपट सुरू आहे. नाशिक महापालिका जेव्हा अस्तित्वात नव्हती, तेव्हापासून भूतपूर्व नाशिक रोड- देवळाली पालिका असल्यापासून येथील बिटको रुग्णालयाचा गोरगरिबांच्या उपचारासाठी लौकिक राहिला आहे. पालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले. रुग्णालयावरील ताणही वाढला. १९९२ पासून सतत वाढत गेलेल्या रुग्णासंख्येला न्याय देणारी व्यवस्था मात्र बिटकोत कधी उभी राहिलीच नाही. महापालिकेच्या राजकारणात कधी सत्ता व पदांच्या रूपाने अस्तित्व दाखवू न शकलेल्या इथल्या राजकारण्यांना त्याचे काही वाटले नाही. परिणामी विस्तरित रुग्णालय उभं राहून त्यात सोयी-सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यात यश न आल्याने कोरोनासारख्या महामारीत येथील सामाजिक आरोग्य व्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.

हेही वाचा: दोन रुपयांची लालूच मेडिकल दुकानदाराच्या अंगाशी! झाला ५ हजारांचा दंड

कुटुंब ठरले व्यवस्थेचे बळी..

बिटको रुग्णालयात वर्षापासून कोवीड सेंटर सक्रिय आहे. त्यात डॉ. धनेश्वर व त्यांचे सहकारी डॉक्टर, सगळे कर्मचारी निष्ठेने वैद्यकीय सोयी-सुविधा पुरवत आहेत. मात्र अपुरे मनुष्यबळ असतानाही रुग्णालयातील बेडसंख्या वाढविली गेली. पण मनुष्यबळ मात्र दिलेच नाही. त्यामुळे आता तब्बल १५ दिवसांपासून उपचार मिळविण्याची मारामार सुरू आहे. देवघडे कुटुंब याच परिस्थितीचे व व्यवस्थेचे बळी ठरले आहे. ११ ते १८ एप्रिल या आठ दिवसांत व्यवस्थित उपचार न मिळाल्याने घरातील तिघांचे बळी गेले. जेल रोड येथील देवघडे कुटुंबावर ही परिस्थिती ओढावली आहे. राजू देवघडे (४८), उषा देवघडे व किरण देवघडे (४६) असे मृत झालेल्या एकाच कुटुंबातील व्यक्तींची नावे आहेत. कुटुंबतील सगळ्यांना कोरोना झाल्‍याने आर्थिक स्थितीमुळे सगळे सरकारी बिटको रुग्णालयात उपचार घेत होते. पण घरातील तीन कर्ते लोक गमावल्याने या कुटुंबातील एका महिलेवर आता दोन कुटुंबाची जबाबदारी पेलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे नाशिक महापालिकेतील अव्यवस्था बिटकोतील अपुरे नियोजन आणखी किती बळी घेणार? हा प्रश्न आहे.

पालिकाच बरी होती..

बिटको रुग्णालयात शहरातील एका माजी नगरसेवकाला असाच जीव गमावावा लागला. सध्या एका विद्यमान नगरसेविकेचे सासरे येथे उपचार घेत असून, उपचार मिळत नाही म्हणून नगरसेविकेचे कुटुंब हैराण आहे. महापालिका होऊनही जर सामान्यांना त्याचा वैद्यकीय उपचार मिळण्याचा घटनादत्त हक्कही मिळत नसेल, तर देवघडे व त्यांच्याप्रमाणेच ‘बिटको’तील अपुऱ्या मनुष्यबळामुळे घरातील कर्ते लोक गमावल्याने वाऱ्यावर आलेल्या कुटुंबाची जबाबदारी कुणावर निश्चित करायची? नाशिक महापालिकेऐवजी गड्या आपली भूतपूर्व नाशिक रोड- देवळाली पालिकाच काय वाईट होती, अशी लोकभावना निर्माण होऊ लागली आहे.

हेही वाचा: सावधान! अंत्यसंस्कारासाठी पैसे घेणारी टोळी सक्रिय; मदतकार्याच्या नावाखाली गोरखधंदा