Malegaon | भाजप प्रवेशासाठी बंडूकाकांना साकडे; राजकीय वर्तुळात खळबळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Advay Hiray invited Bandukaka Bachhav to join BJP Malegaon politics

Malegaon | भाजप प्रवेशासाठी बंडूकाकांना साकडे

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : भाजपचे (BJP) युवानेते अद्वय हिरे व पक्षाचे महापालिका गटनेते सुनील गायकवाड यांनी शुक्रवारी (ता.१९) बारा बलुतेदार मित्र मंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी बंडुकाकांना भाजपमध्ये प्रवेश करुन सक्रिय होण्याचे साकडे घातले. या राजकीय घडामोडींमुळे येथे खळबळ उडाली आहे. निमंत्रणाचा योग्यवेळी व सकारात्मक विचार करु असे सुतोवाच बच्छाव यांनी केले आहेत.

मालेगावातील शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता

युवानेते हिरे पंधरा दिवसांपूर्वी भाजपमध्ये सक्रिय झाले. हिरे व गायकवाड यांनी बैठकांचा सपाटा लावत पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. दोघा नेत्यांनी शुक्रवारी (ता. १९) दुपारी बंडुकाकांच्या घरी भेट देत त्यांना भाजपमध्ये येण्याचे निमंत्रण दिले. बंडुकाका कृषिमंत्री दादा भुसे यांचे गेल्या २५ वर्षापासून अत्यंत निकटवर्तीय राहिले आहेत. श्री. भुसे यांच्या चारही विधानसभा निवडणुकांची प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली आहे. दोन वर्षापासून ते शिवसेनेपासून दुर आहेत. बारा बलुतेदार मंडळाच्या माध्यमातून त्यांचे सामाजिक काम जोमाने सुरु आहे. तसेच, त्यांनी संपूर्ण मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचे स्वतंत्र संघटन तयार करण्यास सुरवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात दोन-तीन सार्वजनिक कामात बंडुकाकांचा उल्लेख जाहीररित्या भावी आमदार म्हणून करण्यात आला होता. वर्षापासून बंडुकाकांची राजकीय वाट कोणती असेल, याबाबत तालुक्यात चर्चा होत आहे. हिरे - गायकवाड यांच्या भेटीमुळे ते भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. बंडुकाका अन्य पक्षात गेल्यास मालेगावातील शिवसेनेत मोठी फूट पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हेही वाचा: ST संपाचा आणखी एक बळी? पेठ आगारातील बसचालकाची आत्महत्या | Nashik

शिवसेनेपुढे भाजपचे कडवे आव्हान

विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका व बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वर्चस्वाची कसोटी लागणार आहे. युवानेते हिरे सक्रिय झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गायकवाड यांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याने महापालिका निवडणुकीत शिवसेनेपुढे भाजपचे कडवे आव्हान असणार आहे. विद्यमान राजकीय घडामोडी पाहता बंडुकाकांच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दल येथे मोठी उत्सूकता आहे. बंडुकाकांच्या निवासस्थानी गोपनीय खलबते झाली. या वेळी पवन ठाकरे, सतीश ढगे, लकी खैरनार, नंदू सोनवणे, समाधान ठोंबरे आदी उपस्थित होते.

''युवानेते अद्वय हिरे व सुनील गायकवाड यांनी आज माजी सदिच्छा भेट घेतली. गायकवाड हे माझे जवळचे मित्र आहेत. दोन्ही आबांनी मला भाजप पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले. सध्या मी कोणत्याही पक्षात नाही. बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करीत आहे. हिरे - गायकवाड यांनी दिलेल्या निमंत्रणाचा भविष्यात निश्‍चितच विचार आणि आदर करेन.'' - बंडुकाका बच्छाव, संस्थापक, बारा बलुतेदार मित्र मंडळ

हेही वाचा: नाशिककर वेदांतने वेधले जगभरातील तज्‍ज्ञांचे लक्ष्य!

loading image
go to top