esakal | Nashik : अखेर शाळांची घंटा वाजली!
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik : शाळांची आज वाजणार घंटा

Nashik : अखेर शाळांची घंटा वाजली!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शासनाने जाहीर केलेल्‍या निर्णयानुसार सोमवार (ता. ४)पासून शहरी भागातील इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्‍या वर्गांना सुरवात झाली. या पार्श्वभूमीवर शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांतर्फे परिसर निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया गेल्‍या तीन-चार दिवसांपासून राबविली जात होती. शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सुमारे नव्वद टक्क्‍यांहून अधिक प्रमाणात लसीकरण झाले असल्‍याचे समजते. शाळा सुरू होत असताना निर्देशांनुसार सध्या विज्ञान, गणित, इंग्रजी विषयांच्‍या तासिका घेतल्‍या जाणार. समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करताना शिक्षण विभागाची पथके शाळांतील सुरक्षितता तपासणार आहेत.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण शैक्षणिक वेळापत्रक कोलमडलेले असताना, आता परिस्‍थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोनाचा राज्‍यातील प्रादुर्भाव नियंत्रणात येत असताना शालेय शिक्षण विभागाने शाळा, कनिष्ठ महाविद्यालये सुरू करण्याची घोषणा केली होती. त्‍यानुसार शाळांची घंटा अखेर वाजणार आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्‍हणून सध्या उपस्‍थितीचे प्रमाण ५० टक्क्‍यांपर्यंत असेल. पालकांचे संमतिपत्र सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच शाळेत प्रवेश दिला जाईल. त्यामुळे कोरोनाकाळात दुरावलेल्‍या आपल्‍या बालमित्रांना, तसेच शिक्षकांना भेटण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांपैकी कुणालाही वैद्यकीय समस्‍या जाणवल्यास मुख्याध्यापकांमार्फत आरोग्य केंद्राला माहिती कळविली जाणार आहे. यानंतर वैद्यकीय पथक शाळेत पोचून आवश्‍यक प्रक्रिया राबवेल. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मास्‍कच्या वापरासह अन्‍य नियम घालून दिले आहेत.

सरकारच्या सूचना

 • विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास पालकांची हवी संमती

 • शाळा दोन सत्रांत भराव्यात

 • एका बाकावर एकच विद्यार्थी बसण्याची हवी व्यवस्था

 • मास्क अनिवार्य हवे

 • वर्गखोल्या, शाळेचा परिसर सातत्याने निर्जंतुकीकरण करावा

पालकांनी हे करावे

 • पाल्यासोबत अतिरिक्त मास्क, सॅनिटायझर द्यावे

 • सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब, घसा खवखवणे ही लक्षणे असल्यास पाल्याला घरीच ठेवावे

 • जेवणाचा स्वतंत्र डबा व सोबत पाणी द्यावे

 • दप्तराचे ओझे कमी ठेवावे

 • शाळेत ये-जा करण्यासाठी स्कूलबस, व्हॅन, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर टाळावा

शाळांनी हे करावे

 • वर्गखोल्या, स्वच्छतागृहे, शाळेचा परिसर वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावा

 • शाळेत ‘हेल्थ क्लिनिक’ सुरू करावे किंवा शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न करावी

 • वर्गात अतिरिक्त मास्क, प्राथमिक आरोग्य सुविधा असाव्यात

 • विद्यार्थ्यांना मास्क घालण्याची आदर्श पद्धत शिकवावी

शिक्षकांनी हे करावे

 • पहिले एक-दोन आठवडे थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांना शाळेची सवय होऊ द्यावी

 • स्टाफ रूम आणि वर्गात मास्क, अंतर ठेवणे आदींचे पालन करावे

 • कोरोनाच्या नियमांची विद्यार्थ्यांकडून उजळणी करून घ्यावी

 • विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीवरही लक्ष

शहरातील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांची स्‍थिती

 • शाळा-कनिष्ठ महाविद्यालये ५११

 • विद्यार्थिसंख्या एक लाख १५ हजार ७५

 • शिक्षक-कर्मचाऱ्यांची संख्या दोन हजार १०३

loading image
go to top