Tulsi Vivah 2022 : सकारात्मक ऊर्जा, प्राणवायू देणाऱ्या तुळशीचा दरवळ

Tulsi VIvah 2022
Tulsi VIvah 2022esakal

पंचवटी (जि. नाशिक) : सकारात्मक ऊर्जा आणि प्राणवायू देणाऱ्या तुळस लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. नाशिकलगतच्या गावांमध्ये काही शेतकऱ्यांनी अन्य पिकांसोबत तुळस लावण्यास प्राधान्य दिले आहे. कोरोनामध्ये प्राणवायूचे महत्त्व अधोरेखित झाल्याने तुळशीच्या लागवडीला स्थान दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

वैज्ञानिक, शास्त्रीयदृष्ट्या आणि आरोग्याच्या दृष्टीने तुळस लाभदायक मानली गेली आहे. तुळशीमुळे बऱ्याच आजारांपासून सुटका मिळते. तुळशीची पाने घरगुती उपायांमध्ये वापरली जातात. आयुर्वेदामध्ये गुणकारी तुळशीचे मोठे योगदान आहे. फुलशेती नांदूर- मानूर, आडगाव शिवार, मखमलाबाद भागात फुलवली जाते. अशा शेतीमध्ये तुळशी लावल्या आहेत. याच शेतातील फुले आणि तुळस फूल बाजारात विक्रीसाठी शेतकरी घेऊन येतात. पूजेसाठी फूल घेण्यासाठी येणारा ग्राहक फुलांसमवेत तुळस घेऊन जातात. घरगुती काढा बनवण्यासाठी तुळशीचा वापर नाशिककर करताहेत. (After Corona trend of farmers towards cultivation of tulsi farming near city tulsi vivah 2022 Nashik News)

तुळशीचे १० प्रकार

सर्वसाधारण तुळशीचे दहा प्रकार नाशिककरांना माहीत आहेत. त्यात श्रीकृष्ण, लक्ष्मी, श्वेत, भू, राम, नील, रक्त, वन, ज्ञान अशा नावाने तुळशीचा उल्लेख केला जातो. तुळस हवा शुद्ध करण्यासाठी उपयुक्त आहे. काही खाणे- पाणी पिण्याच्या अगोदर २ ते ३ पाने पाण्यासोबत घेतल्यास स्मरणशक्ती वाढते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी-कफ, खोकला आणि हृदयरोग यासारख्या आजार-विकारांवर तुळस लाभदायक आहे. उन्हाळे लागल्यास तुळशीची पाने उकळून त्याचा काढा पिल्यास आराम मिळतो.

तसेच तुळशीचा रस नियमित सेवन केल्यास मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढवते. आयुर्वेदात विविध विकारांवर तुळशीच्या पानांचा, मंजुळांचा, खोडाचा, मुळांचा वापर केला जातो, असे आयुर्वेदाचे अभ्यासकांनी सांगितले. पंचवटीतील आयुर्वेद सेवा संघाच्या आरोग्यशाळा-रुग्णालय हे औषधी बनवण्यासाठी ओली तुळस वापरली जाते. ओली तुळस ही खेड्यातील काही जाणकारांकडून मागवली जाते.

तसेच स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व जगत्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांच्या १०८ व्या जन्मोत्सवानिमित्त जय बाबाजी भक्त परिवारातर्फे श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली पाच लाख वृक्ष लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. ‘एक कुटुंब, दोन वृक्ष’ या संकल्पनेतंर्गत व 'महाश्रमदान' उपक्रमांतर्गत ही वृक्षारोपण मोहीम राबविली गेली. त्यामध्ये तुळस या औषधी वनस्पतीचे आयुर्वेदिक व आध्यात्मिक महत्त्व लक्षात घेऊन विविध देशी प्रजातींच्या वृक्षांसमवेत १० हजार तुळस रोपांचे वितरण शहर व जिल्ह्यात करण्यात आले.

Tulsi VIvah 2022
Nashik : पालकमंत्री दादा भुसे यांची Dinner Diplomacy

असे पडले नाव

श्रीकृष्णाची तुला करताना एका पारड्यात श्रीकृष्णाला आणि दुसऱ्या पारड्यात सर्व सोने, संपत्ती ठेवली ; पण तुला काही पूर्ण होईना. मग देवी रुक्मिणीने तुळशीचे एक पान ठेवले आणि तुला पूर्ण झाली. म्हणून या वनस्पतीला तुळस असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. कार्तिक महिन्यात तुळशीला फार महत्त्व आहे. तुळस ही भगवान विष्णूला खूप प्रिय आहे. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमा या दिवसांत तुळशी विवाह करतात. तुळशीपत्र नैवेद्यावर ठेवल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवतात.

"तुळस ही औषधी वनस्पती असून आपल्याला मिळालेले एक वरदानच आहे. सर्वांनी आपल्या घरामध्ये, गॅलरी, गच्चीवर तुळस लावावी. तसेच शेतकऱ्यांनी मोकळ्या जागेत लागवड करावी. तुळशीचे रोप भेट द्यावे." - वैद्य एकनाथ कुलकर्णी, आयुर्वेद सेवा संघ व कार्यशाळा, गणेशवाडी, नाशिक

"तुळस निसर्गातील बहू उपयोगी वनस्पती आहे. त्या अनेक प्रकाराच्या आहेत. कृष्ण तुळस व राम तुळस ही आयुर्वेदिक दृष्टीने उपयोगी व सकारात्मक ऊर्जा निर्माण करणाऱ्या वनस्पती आहे. प्रत्येकाने आपल्या घरामध्ये लावल्यास परिसरातील वातावरण शुद्धीकरण होण्यास व सकारात्मक ऊर्जा मिळण्यासाठी मदत होते." - शेखर गायकवाड, पर्यावरणप्रेमी

Tulsi VIvah 2022
Nashik : बाजार समितीत हवाय उच्च दर्जाचा ‘तिसरा डोळा’!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com