Latest Marathi News | बाजार समितीत हवाय उच्च दर्जाचा ‘तिसरा डोळा’! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Agriculture Market Committee

Nashik : बाजार समितीत हवाय उच्च दर्जाचा ‘तिसरा डोळा’!

पंचवटी (जि. नाशिक) : बाजार समितीत आवारातून दुचाकी व मोबाईल चोरी ही बाब काही नवीन नाही. परंतु यास आळा घालायचा असेल तर आवारात उच्च दर्जाचा तिसरा डोळा हवा, अशी अपेक्षा शेतकरी, हमाल, व्यापारी व इतर घटकांकडून व्यक्त केली जात आहे. (farmers traders demand cctv in market committee to curb theft of mobiles two wheelers Nashik News)

बाजार समिती आवारात काही शेतकरी, हमाल, किरकोळ व्यापारी दुचाकी घेऊन येतात. तसेच बाजार समितीतील सेल हॉलमध्ये किरकोळ मिरची-काटा व्यापारी विक्रेते भाजीपाला, फळभाज्या घेऊन विक्रीदेखील करतात. आजूबाजूच्या परिसरातील नव्हेच तर शहरातून भाजीपाला घेण्यासाठी गर्दी असते. यात बरीच मोबाईल चोर व दुचाकी चोर संधी साधत हातसफाई करीत चोरी करतात.

यावर अंकुश बसावा, यासाठी बाजार समितीने सिक्युरिटी गार्ड व काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेदेखील लावले आहे. तसेच भाजीपाला व आडतदार यांनीदेखील सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परतू याचा दर्जा हा योग्य नसून उच्च दर्जाचे सीसीटीव्ही कॅमेरे बाजार समितीने बसवावे, अशी भावना शेतकरी तसेच सामान्य नागरिक व्यक्त करीत आहे.

हेही वाचा: Fake Pesticides : बनावट कीटकनाशकांनी जिल्ह्यात शेतकरी हैराण!

शेतकरी लूटही थांबेल

काही अल्पभूधारक शेतकरी हा काढलेला किरकोळ शेतमाल हा बाजार समितीत घेऊन येतो. बऱ्याचदा काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्याची लूट होते. शेतमाल हिसकावून घेतला जातो. कवडीमोल भावात खरेदी करतात आणि शेतकऱ्यांना वर बळजबरी करतात. बाजार समितीच्या आवारात जागोजागी जर सीसीटीव्ही बसविण्यात आले, तर हे प्रकार थांबतील. शेतकरी बेधडक शेतमाल घेऊनदेखील येईल.

परिणामी लूटदेखील थांबेल. बाजार समिती आवारात मोबाईल चोरी होणे नित्य बाब आहे. तसेच त्याच प्रमाणात दुचाकी चोरीदेखील होते. सीसीटीव्ही बसविल्यास याचे प्रमाण शून्यावर येईल. यदा कदाचित चोरी झाली तरी सीसीटीव्हीच्या नजरेतून वाचणार नाही. तसेच, शेतकऱ्यांसोबत व्यापाऱ्यांचीही लूटमार थांबेल.

हेही वाचा: Nashik Bribe Crime : 50 हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह महिलेला अटक

पोलिस यंत्रणा म्हणते

सीसीटीव्ही कॅमेरे हे उच्चप्रतीचे वापरावेत. त्यात झूम लेन्स आउटडोअर, आयपीपीटी झेड सेन्सर कॅमेरे असावेत. नाशिक बाजार समिती आवारात येणारा व जाणारा प्रत्येक घटक स्पष्ट दिसावा. चारचाकी, दुचाकी नंबर प्लेटसह दिसावी. लिलाव होणारे ठिकाण, सेल हॉल व त्यामागील जागादेखील तिसऱ्या डोळ्याच्या कक्षेत यावी. बाजार समिती दिंडोरी रोडवरील कार्यालयात व बाहेर, मुख्य प्रवेशद्वार, कॅमेरे आहेत.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर डीव्हीआर जप्त केल्याने सेल हॉलमधील आठ कॅमेरे बंद स्वरूपात आहेत. तसेच शरदचंद्रजी मार्केट यार्डात अन्नधान्य विभाग, फ्रूट विभाग, कांदा बटाटा विभाग या ठिकाणी एकूण २५ कॅमेरे आहेत. परंतु दर्जेदार कॅमेरे नसल्या बाबत सर्व घटकांमध्ये चर्चा आहे.

"नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही शेतकऱ्यांची संस्था आहे. प्रत्येक घटकास सेवा देणे समितीचे काम आहे. त्या अनुषंगाने अद्ययावत तंत्रज्ञान युक्त कॅमेरे बसविण्यासाठी प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे." - अरुण काळे, सचिव, बाजार समिती, नाशिक.

हेही वाचा: Nashik : पालकमंत्री दादा भुसे यांची Dinner Diplomacy