esakal | झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेनंतर तब्बल २८ कर्मचारी पॉझिटिव्ह

बोलून बातमी शोधा

Dr Zakir Hussain Hospital
झाकीर हुसेन रुग्णालय दुर्घटनेनंतर तब्बल २८ कर्मचारी पॉझिटिव्ह
sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : बेडची कमतरता, तर कधी ऑक्सिजन गळती या अनेक कारणांमुळे अडचणींचा सामना करणाऱ्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाने गाठले असून, आठ दिवसांत तब्बल २८ कर्मचारी बाधित झाल्याची बाब समोर आली आहे. यामुळे महापालिकेच्या वैद्यकीय सेवेवर मोठा ताण निर्माण झाला असून, तातडीने नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी होत आहे.

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महापालिकेने नवीन बिटको, डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय कोविड सेंटर म्हणून जाहीर केले. या दोन्ही रुग्णालयांत इतर रुग्णसुद्धा तपासले जात होते. परंतु वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे दोन्ही हॉस्पिटल कोविड सेंटर म्हणून जाहीर करण्यात आले. दोन्ही रुग्णालयांवर मोठा ताण निर्माण झाला आहे. बिटको रुग्णालयात सध्या ७४१ रुग्ण उपचार घेत आहेत, तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात पावणेदोनशे रुग्ण उपचार घेत आहे. झाकीर हुसेन रुग्णालयात तीन-तीन शिफ्टमध्ये सुमारे शंभरच्या आसपास कर्मचारी काम करत आहे. यात नर्सेसची संख्या मोठी आहे. रुग्णांची सेवा करताना मास्क, पीपीई किट आदी साहित्य महापालिकेतर्फे पुरविण्यात आले आहे. असे असतानाही आठ दिवसांत २८ कर्मचारी पॉझिटिव्ह आढळले आहेत. यामध्ये १४ नर्स, दोन डॉक्टर व इतर तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

हेही वाचा: संतापजनक प्रकार! जात पंचायतने महिलेला दिली पंचांची थुंकी चाटण्याची शिक्षा..

दुर्घटनेनंतर चार ते पाच दिवसांत संसर्ग

डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात २१ एप्रिलला ऑक्सिजन भरताना गळती होऊन मोठी दुर्घटना घडली होती. यात २४ रुग्णांना प्राण गमवावे लागले. दुर्घटना घडली, त्या वेळी रुग्णालयात उपस्थित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली. रुग्णांना इतरत्र हलविण्यापासून तर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापर्यंतच्या कामात सहभाग घेतला. दुर्घटनेनंतर चार ते पाच दिवसांत कार्यरत कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचा अंदाज रुग्णालय प्रशासनाने व्यक्त केला.

हेही वाचा: वा रे पठ्ठ्या! पोलिस ठाण्यातच लगावली पोलिसाच्या कानशिलात; दोघांविरुद्ध गुन्हा