Agriculture News : कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची कसरत; मजुरांसाठी करावे लागतेय स्वतंत्र वाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Agriculture News

Agriculture News : कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांची कसरत; मजुरांसाठी करावे लागतेय स्वतंत्र वाहन

जुनी शेमळी : कांदा पिकाने शेतकऱ्यांना कधी हसवले तर कधी रडवले. यंदाच्या कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांना सुरवातीलाच रडकुंडीला आणले आहे. मजूर टंचाईने शेतकरी बेजार झाले असून, दहा ते अकरा हजार रुपये एकरी खर्च येत आहे. मजुरांची ने- आण करण्यासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था करावी लागत आहे.

हेही वाचा: Agriculture News : कापसाचे दर मकरसंक्रांतीनंतर वाढीची शक्यता; जिनिंग चालक संपावर जाणार?

कसमादे परिसर कांद्याचे उत्पादन घेण्यात अग्रेसर आहे. या भागातील शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णपणे कांदा पिकावरच अवलंबून असते. त्यामुळे शेतकरी उन्हाळी कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. चालूवर्षी पावसाचे प्रमाण चांगले राहिल्याने भुजल पातळी समाधानकारक राहिली. त्यामुळे उन्हाळी कांदा लागवड क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. मात्र, सर्वत्र एकाचवेळी कांदा लागवड व पावसाळी कांद्याची काढणी सुरू झाल्याने मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. लागवडीसाठी आवश्यक मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे.

मागणीच्या तुलनेत मजुरांचा पुरवठा होत नसल्याने मजुरीचा दर वधारला आहे. दहा ते अकरा हजार रुपये ठेका पद्धतीने मजुरांना मोजावे लागत आहे. त्यासाठी रिक्षा, ट्रॅक्टर, पिकअप, स्कूटरवरून ने- आण करावी लागत आहे. मजुरांचा शोध घेऊन दर निश्‍चित करतानाही मोठ्या अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

छोट्या शेतकऱ्यांची अडचण

बड्या भांडवलदार शेतकऱ्यांकडे या मजुरांची चांगलीच बडदास्त ठेवली जाते. मात्र, कमी क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांना हे शक्य होत नाही. याचा फटका लहान शेतकऱ्यांना बसतो. त्यांना इतरांची कामे होइपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. तोपर्यंत लागवडीची वेळ निघून गेलेली असते. परिणामी, मोठा फटका बसून उत्पादनात घट होते.

हेही वाचा: Farmer: सरकार शाईफेक-सीमावादात व्यस्त! नुकसानग्रस्त शेतकरी अजुनही विम्याच्या प्रतीक्षेत

आडजी- पडजी पद्धतीचा वापर

कांदा लागवडीसाठी मजुरांची टंचाई असताना कांदा रोपे तयार झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे रोपे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही रोपे लागवड करण्यासाठी सर्वांची धावपळ सुरू झाली आहे. त्यामुळे मजुरांची वाट पाहण्यापेक्षा आपल्या घरातील व्यक्ती व शेजारील व्यक्ती अशा पद्धतीने जमवाजमव करून कांदा लागवड करण्यात येत आहे.

''बियाणे टाकल्यानंतर दीड ते दोन महिन्यात रोप लागवडीसाठी योग्य होते. रोपांना गाठ तयार होण्यापूर्वी शेतात लागवड करावी लागते. अन्यथा ते वाया जाते. त्यामुळे वेळेत लागवडीसाठी मजुरांची विनवणी करावी लागते.'' - राहुल शेलार, शेतकरी, जुनी शेमळी