अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना | ‘हे’ कवी नव्हे हो, ‘ते’ शाहीर हवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना
‘हे’ कवी नव्हे हो, ‘ते’ शाहीर हवे

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना | ‘हे’ कवी नव्हे हो, ‘ते’ शाहीर हवे

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या प्रसार-प्रसारासाठी निर्माण करण्यात आलेल्या गीताला आयोजकांनी गांभीर्याने न घेतल्याचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. त्यातून नव्या वादाला तोंड फुटले असून, ‘शाहीर प्रताप परदेशी’ यांच्या नावाचा उल्लेख केला गेला असला, तरी नाम साधर्म्यामुळे छायाचित्र मात्र नांदगाव येथील ज्येष्ठ कवी प्रताप परदेशी यांचे वापरण्यात आले आहे. त्यामुळे, ‘हे’ कवी नव्हे हो, ‘ते’ शाहीर हवे, असे म्हणण्याची वेळ आली आहे. या संदर्भात महाकवी कालिदास कलामंदिरातील संमेलन कार्यालयात ‘राणा की सेना’चे डॉ. वसंत ठाकूर यांच्यासह आणखी एक तक्रार प्राप्त झाली आहे.

हेही वाचा: ब्रिटनच्या प्रिन्सची 1.3 अब्ज डॉलरची गुंतवणूक

जिल्ह्यातील साहित्यिकांची मांदियाळी संमेलन गीतात शब्द आणि छायाचित्र रूपात दाखविण्यात आली. मात्र, हा प्रयोग करताना पुरेशी काळजी, शहानिशा केली गेली नसल्याचे या प्रकारावरून समोर येत आहे. वास्तविक जुन्या पिढीतील शाहीर प्रताप परदेशी यांचे लोकगीत, पोवाडे, शाहिरी या क्षेत्रातील मोठे योगदान सर्वश्रुत आहे. त्यामुळे नाशिकमधील साहित्यिकांच्या मांदियाळीत त्यांचे नाव येणे अपेक्षित होते. त्याप्रमाणे ते आलेही. पण, या गीताचे व्हिडिओ चित्रण करताना शाहीर परदेशींच्या नावासमोर मनमाड (नांदगाव) येथील कवी प्रताप परदेशी यांचे छायाचित्र आयोजकांनी वापरल्याचे दिसत आहे. मिलिंद गांधी आणि संजय गिते यांनी बनविलेली ही चित्रफीत मंडप प्रारंभ सोहळ्यावेळी रिलीज करण्यात आले. त्यातील तांत्रिक (व्हिडिओ) त्रुटी अजूनही समोर येत आहेत. त्यातून, आयोजकांनाच जिल्ह्यातील साहित्यिक, कवी, शाहिरांबद्दल आणि एकूणच इतिहासाबद्दल माहिती नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

त्याचवेळी अशी चूक होऊ नये, यासाठी पुरेशी दक्षता बाळगून आवश्‍यक शहानिशाही केली गेली नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे. त्यातूनच, प्रताप परदेशी यांच्या नामसाधर्म्यामुळे आयोजकांचा गोंधळ उडाल्याचे स्पष्ट होत आहे. संमेलन गीतात गीतकाराला ‘शाहीर प्रताप परदेशी’ यांचाच उल्लेख करावयाचा होता. त्यासाठी त्यांनी शहरातील एका ज्येष्ठ लेखकांचे मार्गदर्शनही घेतले होते. मात्र, व्हिडिओ वापरलेले छायाचित्र कवी प्रताप परदेशी (मनमाड) यांचे असून, ते वापरताना कुठल्याही प्रकारची शहानिशा केलेली दिसत नाही. विशेष म्हणजे, दोघांच्या नावात साम्य असले, तरी ‘शाहीर’ आणि ‘कवी’ यातील फरकही आयोजकांना कळू नये का? हे न उलगडणारे कोडे आहे. त्यामुळेच आयोजकांना संमेलन गीताबद्दल गांभीर्य नाही का, असा सवालही उपस्थित होत आहे.

"मराठी साहित्य संमेलन गीतात शाहीर प्रताप परदेशी यांच्या नावाचा उल्लेख करायला हवा होता, असे ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी सुचविले होते. त्यांचीच सूचना मी अमलात आणली आहे."

- मिलिंद गांधी, गीतकार

loading image
go to top