
Nashik News : बोरी- आंबेदरी बंदिस्त जलवाहिनी समर्थनार्थ सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन
मालेगाव / झोडगे (जि. नाशिक) : बोरी आंबेदरी बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प झालाच पाहिजे. हा प्रकल्प फक्त झोडगे नव्हे तर माळमाथ्यासाठी वरदान आहे. मुठभर लोकांचा या प्रकल्पाला विरोध आहे. प्रकल्पासाठी रक्ताच्या अखेरच्या थेंबापर्यंत लढू असा निर्धार करीत झोडगे व पंचक्रोशीतील गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रीय महामार्गावरील झोडगे येथे रास्तारोको आंदोलन केले. झोडगे गावातही कडकडीत बंद पाळण्यात आला.
पालकमंत्री दादा भुसे यांनी दुरध्वनीवरुन जलवाहिनीचे काम लवकरच सुरु होईल असे आश्वासन देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनकर्त्यांना तालुका पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली. (All Party Rasta Roko Andolan in support of Bori Ambedari dam canal Nashik Latest Marathi News)
रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. झोडगेसह अस्ताने, लखाणे, राजमाने, जळकू, कंधाणे येथील शेतकरी व सर्वपक्षीय कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ‘पाणी आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे’, ‘समान न्याय झालाच पाहिजे’, ‘बंदिस्त जलवाहिनी झालीच पाहिजे’, ‘अभी नही तो कभी नही’ आदी घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी महामार्ग दणाणून सोडला. आंदाेलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त होता.
यावेळी भाजपच्या माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा देसाई, माजी सरपंच दीपक देसले, माजी उपसरपंच नथु देसले, अस्ताने सरपंच अविनाश शिरसाठ, भाजपचे विजय देसाई, दीपक पवार, संजय कदम, योगेश देसले, शिवसनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण देसले, दिनकर देसाई, निळकंठ सोनजे, शरद देसले, सरपंच चंद्रकला सोनजे. उपसरपंच बेबाबाई देसले, किशोर देसले, प्रदीप देसले, ज्ञानेश्वर देसले, बंटी देसले, दिपाली भामरे, प्रदीप देवरे, धर्मा पवार, लखाणे येथील डॉ.साहेबराव इंगळे, गोरख देवरे, सुभाष गिल, परेश सोनवणे आदींची भाषणे झाली. त्यांनी बंदिस्त जलवाहिनीला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांवर कठोर शब्दात टीका केली. आंदोलनकर्त्यांनी विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांचे प्रतिकात्मक पुतळे जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. झोडगे बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
हेही वाचा : सीमावादात रक्त सांडायला मराठी माणूसच का?
हेही वाचा: Nashik News : वीजप्रश्नी सुराणे ग्रामस्थांचा उपकेंद्रात ठिय्या
अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, तहसीलदार कैलास पवार, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप पवार यांनी सुरुवातीला आंदोलनकर्त्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र आंदोलनकर्ते जलवाहिनीचे काम सुरु करा या मागणीवर ठाम होते. अखेर श्री. भुसे यांनी माजी सरपंच दीपक देसले यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधून जलवाहिनीचे काम होईल.
रास्तारोको मागे घ्यावा अशी विनंती केली. त्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले. यापुर्वी याच मागणीसाठी १८ नोव्हेंबरला रास्तारोको आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी पाटबंधारे विभागाने आठ दिवसात काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्याची आंदोलनकर्त्यांनी आठवण करुन दिली.
हेही वाचा: Nashik News : नाशिक रोडची वाहतूक कोंडी ठरतेय डोकेदुखी; उपाययोजना करण्याची मागणी