
ऑनलाईन फसवणूकीतील रक्कम पुन्हा तक्रारदाराच्या खात्यात सुपूर्द
नाशिक : ऑनलाइन माध्यमातून निवृत्त ज्येष्ठाची ३ लाख ९८ हजार ४९८ रुपयांची फसवणूक (Online money Fraud) केल्यानंतर सायबर पोलिसांनी (Cyber Police) या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ कारवाई केल्याने वृद्धाची सर्व रक्कम पुन्हा त्यांच्या बँक खात्यात वर्ग (credit) झाली आहे. (amount of online fraud is again credited to the complainants account by cyber police Nashik News)
बीएसएनएल विभागातून निवृत्त झालेले रामदास शिवराम अमृतकर (रा. वडाळा शिवार) यांना वीज बिल न भरल्याचा मेसेज आला. तसेच, बिल न भरल्यास वीजजोडणी खंडित करण्याचा इशारा पाठविण्यात आला. त्यानंतर मोबाईलवर संशयिताने संपर्क साधत बिल भरण्यास सांगितले. श्री. अमृतकर यांनी वीज बिल भरणा केल्याचे संशयितास सांगितल्यानंतर संशयिताने बिल कॉपी देण्यासाठी एक लिंक पाठवीत असल्याचे सांगून माहिती मागितली. लिंक मिळताच अमृतकर यांनी लिंक ओपन केली. त्यानंतर सदर ॲप त्यांच्या मोबाइलमध्ये इन्स्टॉल झाले. त्यानंतर सात लाखांची मुदत ठेव मोडून त्यातून प्रत्येकी ९८ हजार रुपयांचे चार व्यवहार करून तीन लाख ९८ हजार ४९८ रुपये परस्पर काढून घेतले.
खात्यातून पैसे जात असल्याचे समजताच श्री. अमृतकर यांनी मुलीस सांगितले. त्यानंतर मुलीने सदर ॲप अनइन्स्टॉल करत तत्काळ सायबर पोलिस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला. सायबरचे पोलिस उपनिरीक्षक दानिश मन्सुरी व अंमलदार अनिल राठोड यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने पावले उचलत आर्थिक व्यवहार तपासले. संशयिताने खात्यातून काढलेली रक्कम क्रेड या ॲपवर घेऊन आयसीआयसीआय बँकेचे क्रेडीट कार्डचे थकीत बिल भरण्यासाठी वापरत असल्याचे सायबर पोलिसांना आढळले. पोलिसांनी तातडीने संबंधित बँक व क्रेडीट कार्ड कंपनीशी संपर्क साधून व्यवहार थांबवण्यास सांगितले. बँकांनीही संपूर्ण सहकार्य केल्याने संशयिताचे सर्व व्यवहार थांबवले. त्यामुळे तिसऱ्या दिवशी अमृतकर यांच्या बँक खात्यातून गेलेले सर्व पैसे पुन्हा त्यांना मिळण्यास मदत झाली.
हेही वाचा: नाशिक : जिल्हा परिषदेत विभागातील CCTV कॅमेरे अलर्टवर!
"नागरिकांनी कोणतेही अनोळखी ॲप, लिंक मोबाईलमध्ये ओपन किंवा इन्स्टॉल करू नये. आपल्या बँक खात्याची किंवा पिन नंबर आदी गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये. ऑनलाइन फसवणूक झाली असल्यास तातडीने सायबर पोलिस ठाण्यात संपर्क साधावा. जेणेकरून आर्थिक फसवणूक टाळता येईल." - सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे
"फसवणूक होत असल्याचे लक्षात येत असताच वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली. तसेच, मोबाईलमधील क्विक सपोर्ट हे ॲप काढून टाकले. पोलिसांनीही सहकार्य करीत बँकेशी पत्रव्यवहार करून आर्थिक व्यवहार थांबवले. पोलिसांच्या मदतीने आम्हाला आमचे पैसे परत मिळाले." - नीलेश अमृतकर, तक्रारदारांचा मुलगा
हेही वाचा: सैराट स्टाईल मारहाण प्रकरणी तब्बल 20 ते 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल!
Web Title: Amount Of Online Fraud Is Again Credited To Complainants Account By Cyber Police Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..