Diwali 2022 : आनंद द्विगुणित करण्यासाठी घ्या खबरदारी; MSEDCLचे आवाहन | Latest Marathi News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

MSEDCL News

Diwali 2022 : आनंद द्विगुणित करण्यासाठी घ्या खबरदारी; MSEDCLचे आवाहन

नाशिक : दिवाळीची लगबग सुरू झाली असून, सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महावितरणच्या नाशिक परिमंडलातील ग्राहकांनी विद्युत उपकरणांचा सतर्कतेने वापर करीत, विद्युत सुरक्षिततेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे व सुरक्षित राहण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. (Appeal of MSEDCL to city people for safe Diwali 2022 Nashik Latest Marathi News)

दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतषबाजी यामुळे दुर्दैवी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे. अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने अशा दुर्दैवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या दिवशी फटाक्याने लागलेल्या आगीच्या घटना दरवर्षीच मोठ्या संख्येने होतात.

यात केवळ आर्थिकच नव्हे तर जीवितहानीही होण्याची शक्यता असते. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासीनता यामुळे अशा घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महावितरणने काही खबरदारीचे उपाय सुचविले आहेत.

हेही वाचा: Nashik : Offline पद्धतीने स्वीकारली जाणार बिले; Online प्रणालीस महिन्याचा अवधी

दिव्यांनी घराची सजावट करताना ती मोकळ्या जागेतच लावावीत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर तसेच पंखे, वीज तारा यापासूनही ते दूर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा. तुटलेल्या वीज तारा वापरू नयेत किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या इन्शुलेशन टेपने त्या सुरक्षित करून घ्याव्यात. तुटलेले सॉकेट्स वापरू नयेत. घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

आपत्कालीन संपर्क

कुठल्याही कारणामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यास सुरळीत करण्यासाठी ग्राहक सुविधा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

अशी घ्यावी काळजी

- विद्युत यंत्रणा, वीजतारांजवळ वा रोषणाई जवळ फटाके उडवू व फोडू नयेत.

- विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नयेत.

- एकाच विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये व त्यामध्ये काड्या खोचू नये

- रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे, त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात.

हेही वाचा: Shivsena : CMच्या हस्ते 'बाळासाहेबांची शिवसेना पक्ष' कार्यालयाचे उद्‌घाटन