esakal | राज्य शासनाकडून महापालिकेत नवीन पदांना मंजुरी; रिक्त पदांची भरती शक्य
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Municipal Corporation

राज्य शासनाकडून महापालिकेत नवीन पदांना मंजुरी; रिक्त पदांची भरती शक्य

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : अनेक वर्षांपासून मागणी असलेल्या महापालिकेच्या ६४५ नवीन पदांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यासंदर्भात लेखी आदेश प्राप्त झाले आहेत. एकूण पदे एक हजार ५२ असून, त्यापैकी ४१७ पदे मंजूर आकृतिबंधातील आहेत. उर्वरित ६४५ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन आकृतिबंधात वैद्यकीय विभागासाठी ३११, तर अग्निशमन दलासाठी ५१८ पदे भरली जाणार आहे.

महापालिकेच्या जुन्या आकृतिबंधानुसार विविध संवर्गातील सात हजार ८२ पदे मंजूर आहेत. गेल्या काही वर्षात सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांची संख्या वाढली. महसुली खर्च ३५ टक्क्यांपर्यंत येत नाही तोपर्यंत भरती करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्टीकरण दिले होते. त्या मुळे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. आठ वर्षांपासून रिक्त पदांचा प्रश्न आहे. अनेकदा आश्वासने दिली गेली, मात्र पूर्तता झाली नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय व अग्निशमन दलातील पदे भरण्यासाठी शासनाकडे तगादा लावण्यात आला होता. कोरोनामुळे वैद्यकीय विभागातील पदे भरण्यास तातडीची बाब म्हणून मान्यता देण्यात आली. रिक्त पदांची भरती करताना आकृतिबंध मंजूर करावा लागणार असल्याने त्याअनुषंगाने नवीन पदांची निर्मितीला शासनाने मान्यता दिली आहे. यापूर्वीचे मंजूर ४१७ पदाव्यतिरिक्त ६३५ नवीन पदांच्या निर्मितीला मान्यता देण्यात आली आहे.

हेही वाचा: नातेवाइकांचा आक्रोश अन्‌ हुंदके पावलोपावली! अमरधाममध्ये हृदय पिळवटून टाकणारे दृश्य

वाढत्या लोकसंख्येनुसार पदे

शहराची लोकसंख्या सातत्याने वाढत असल्याने वाहतूक नियोजन, अतिक्रमण निर्मूलनासाठी नागरी पोलिस ठाणे कार्यान्वित करणे, राष्ट्रीय फेरीवाला धोरण अवलंबविणे, आपत्ती व्यवस्थापन, तसेच स्मार्टसिटीच्या अनुषंगाने नवीन पदांची निर्मिती करण्यात आल्याचे शासनाच्या आदेशात म्हटले आहे.

मूल्य निर्धारण कर संकलन अधिकारी पदाला उपायुक्त, सहाय्यक मूल्यनिर्धारण करसंकलन अधिकारी पदाला विभागीय अधिकारी, उपवैद्यकीय अधीक्षक व मुख्य वैद्यकीय अधिकारी पदाचे सहाय्यक अधिकारी पदात समायोजन करण्यात आले आहे.

या पदांना मिळाली मान्यता (कंसात पदसंख्या)

वैद्यकीय विभाग : वैद्यकीय अधीक्षक (चार), निवासी वैद्यकीय अधिकारी (चार), वैद्यकशास्त्र तज्ज्ञ (आठ), शल्यचिकित्सक (आट), स्त्रीरोगतज्ज्ञ (१६), बालरोगतज्ज्ञ (१६), क्ष- किरणतज्ज्ञ (चार), बधिरीकरणतज्ज्ञ (नऊ), अस्थिव्यंगतज्ज्ञ (चार), कान- नाक- घसातज्ज्ञ (चार), नेत्र शल्यचिकित्सक (चार), त्वचारोगतज्ज्ञ (तीन), रक्त संक्रमण अधिकारी (दोन), दंत शल्यचिकित्सक (चार), मानसोपचारतज्ज्ञ (दोन), मेट्रन (चार), असिस्टन्स मेट्रन (चार), एएनएम (९८), मिश्रक (५०), आहारतज्ज्ञ (सहा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (३३), क्ष-किरण तंत्रज्ञ (१६), क्ष-किरण सहाय्यक (आठ) अग्निशमन विभाग- विभागीय अग्निशमन अधिकारी (दोन), सहाय्यक अग्निशमक केंद्र अधिकारी (१८), लिडिंग फायरमन (९८), फायरमन (२९९), वायरलेस ऑपरेटर (सहा), केंद्र चालक (९८), यंत्रचालक (९८), अभियांत्रिकी विभाग- कार्यकारी अभियंता स्थापत्य (१३), शाखा अभियंता स्थापत्य (३२), शाखा अभियंता यांत्रिकी (चार), शाखा अभियंता विद्युत (चार), लेखा व लेखापरीक्षण विभाग- कनिष्ठ लेखापरीक्षक (४०), कनिष्ठ लेखापाल (१९).

घनकचरा व्यवस्थापन विभाग- विभागीय स्वच्छता निरीक्षक (२८), स्वच्छता निरीक्षक (८०)

हेही वाचा: नाशिकच्या वालदेवी धरणात सहा जण बुडाले; पोलिसांचे शोधकार्य सुरु

शासनाने नवीन पदांना मान्यता दिल्याने रिक्त पदांच्या भरतीमधील अडसर दूर झाला आहे. आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपर्यंत आणून रिक्त पदे भरली जातील.

- गणेश गिते, स्थायी समिती सभापती, महापालिका

शहराचा वाढता विस्तार व त्याअनुषंगाने नवीन पदनिर्मितीची आवश्यकता होती. ठाकरे सरकारने शहराची गरज ओळखून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्या मुळे सरकारचे अभिनंदन.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, महापालिका