esakal | नातेवाइकांचा आक्रोश अन्‌ हुंदके पावलोपावली; अमरधाममध्ये हृदय पिळवटून टाकणारे दृश्य
sakal

बोलून बातमी शोधा

Many bodies are being cremated at the same time at Panchavati in Nashik

नातेवाइकांचा आक्रोश अन्‌ हुंदके पावलोपावली! अमरधाममध्ये हृदय पिळवटून टाकणारे दृश्य

sakal_logo
By
योगेश मोरे

म्हसरूळ (नाशिक) : एगार, दिले जाणारे अग्निडाग, एकाचवेळी अनेक धगधगत्या चिता, अग्नी शांत होऊन होणारी राख आणि पडल्या अस्थी उचलताच दुसरे सरण रचण्याची तयारी, त्यात मृतांच्या नातेवाइकांचा आक्रोश, पाणावलेले डोळे आणि दिले जाणारे हुंदके असे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पंचवटी अमरधाममध्ये सध्या दिसत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे अमरधाममध्ये २४ तास चिता जळताना दिसत आहेत. येथील बेडची संख्या कमी पडत असल्याने मिळेल त्या जशा असेल तशा जागेत सरण रचून त्यावर मृतदेह ठेवून त्याला अग्निडाग देण्यात येत आहे. त्यामुळे अमरधाममध्ये पाय ठेवण्याइतपतही जागा मिळणे कठीण होत आहे. एका सरणावरच्या अस्थींचे विसर्जन केल्यानंतर लगेच तेथे दुसरे सरण रचण्यात येत आहे. पंचवटी अमरधाममध्ये कोणत्याही वेळी नजर टाकली असता तेथे सर्वत्र चिता जळताना दिसत आहेत. मृत झालेल्यांचे मोजकेच नातेवाईक अमरधाममध्ये येत असले तरी मृतांची संख्या इतकी मोठी आहे, की येथे नातेवाइकांचीही संख्या वाढत आहे. आपल्या जवळची व्यक्ती गेल्याचे दुःख अनावर झालेल्या नातेवाइकांचा आक्रोश आणि हुंदके येथे पावलोपावली ऐकायला मिळत आहेत. येथील असे दृश्य बघून इतरांच्या डोळ्यातही नकळत पाणी आल्याशिवाय राहत नाही. मृत्यू वाढल्याने अमरधाममध्ये दिवस-रात्र अंत्यसंस्कारासाठी मृतदेह येत असल्यामुळे येथील कामगारांना थोडीही उसंत मिळत नाही. रात्री-अपरात्री आलेल्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी सरण रचण्याची तयारी त्यांना करावी लागत आहे.

हेही वाचा: कोरोना जाईना, लग्न ठरेना! नोकऱ्या गमावलेल्या ग्रामीण भागातील तरुणांची व्यथा

सरण रचूनच अंत्यसंस्कार

पंचवटी अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी नऊ बेड असून, येथे येणाऱ्या मृतदेहांचा आकडा २० ते २५ पर्यंत पोचत आहे. नाशिक अमरधाममध्ये दोन विद्युतदाहिन्या असल्यामुळे त्यात कमी वेळेत मोठ्या प्रमाणात अंत्यसंस्कार होत आहेत. तशी व्यवस्था पंचवटीत नसल्यामुळे सरण रचूनच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. नाशिक अमरधाममध्ये वरच्या दोन शेडमध्ये सध्या अंत्यसंस्कार होत आहेत. वरच्या शेडमध्ये बेड शिल्लक नसेल तरच खालच्या शेडमध्ये मृतदेह आणले जात आहेत.

हेही वाचा: पुन्हा तीच व्यथा! आईच्या मृत्यूनंतर 7 दिवसांनी मुलाचीही अंत्ययात्रा

loading image