esakal | महाराष्ट्राच्या सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण; बागलाण तालुक्यावर पसरली शोककळा
sakal

बोलून बातमी शोधा

Martyr Swapnil Jadhav

महाराष्ट्राच्या सुपुत्राला जम्मू-काश्मीरमध्ये वीरमरण; बागलाण तालुक्यावर पसरली शोककळा

sakal_logo
By
रोहित कणसे

सटाणा (जि. नाशिक) : भाक्षी (ता.बागलाण) येथील रहिवासी आणि गेल्या चार वर्षांपासून भारतीय सैन्यदलात देशसेवेचे कर्तव्य बजावत असलेले तालुक्याचे भूमिपुत्र व जवान स्वप्नील उर्फ सोपान रौंदळ यांना जम्मू- काश्मीरच्या उधमपूर येथे वीरमरण आले. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त समजताच सटाणा शहर व बागलाण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

उधमपूर सेक्टर येथे सुरू होते ट्रेनिंग

याबाबत बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील यांच्याकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, गेल्या चार वर्षांपासून सैन्यदलात असलेले बागलाण तालुक्याचे भूमिपुत्र जवान स्वप्नील रौंदळ यांचे सध्या जम्मू- काश्मीर येथील सैन्यदलाच्या उधमपूर सेक्टर येथे ट्रेनिंग सुरू होते. ट्रेनिंगदरम्यान ते ज्या रूममध्ये वास्तव्यास होते, त्या रूमला शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या भीषण आगीत जवान स्वप्नील रौंदळ यांच्यासह अन्य तीन जवानांचा होरपळून मृत्यू झाल्याचे समजते आहे. दरम्यान, जवान स्वप्नील रौंदळ यांचे पार्थिव भाक्षी येथे अंतिम संस्कारासाठी कधी येईल, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचेही तहसीलदार .इंगळे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

संपूर्ण तालुक्यात पसरली शोककळा

शहीद जवान स्वप्नील रौंदळ हे अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई, वडील, एक बहीण आणि एक भाऊ असा परिवार आहे. त्यांच्या दुर्दैवी निधनाचे वृत्त शहर व तालुक्यात येऊन धडकताच शोककळा पसरली आहे. जवान रौंदळ यांच्या निधनानंतर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत असून तालुक्याने भारतमातेचा सुपुत्र गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.

loading image