"मराठी बाणा" शब्दावर केवळ अशोक हांडे यांचा हक्‍क नाही...!

Mumbai-High-Court.jpg
Mumbai-High-Court.jpg

नाशिक : मराठी माणसांच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या मराठी बाणा शब्दाच्या वापरावर कोण्या एकाला व्यावसायिक हक्‍क सांगता येणार नाहीत, असे स्पष्ट करीत मुंबई उच्च न्यायालयाने नावाचा प्रसिद्ध गीतकार, संगीतकार अशोक हांडे व त्यांची संस्था चौरंगचा त्या स्वरूपाचा दावा फेटाळून लावला आहे. 

शेमारू विरोधातल्या याचिकेवर उच्च न्यायालयाचा निवाडा 

गेल्या किमान पंधरा वर्षांपासून मराठी बाणा हा शब्द आपणच प्रचलित केला असल्याने अन्य कोणी त्याचा वापर करण्यावर अशोक हांडे यांनी हरकत घेतली होती. प्रत्यक्षात न्यायालयाने अगदी 1900 सालापासून अनेकवेळा हा शब्द वापरला गेल्याचा आणि संयुक्‍त महाराष्ट्राची संपूर्ण चळवळच जणू त्या शब्दाभोवती गुंफली गेली होती, हा प्रतिवादी शेमारू इंटरटेनमेंटच्या वकिलांचा युक्‍तिवाद मान्य करून न्या बी. पी कुलाबावाला यांनी या प्रकरणी कोणताही तातडीचा दिलासा हांडे यांना देण्यास असमर्थता दाखवली. 

दावा खोडून काढताना अनेक गोष्टी निदर्शनास

गेल्या जानेवारी महिन्यात शेमारू इंटरटनेमेंटने मराठी बाणा नावाच्या टीव्ही चॅनलची घोषणा केल्यानंतर चौरंग संस्था, अशोक हांडे व त्यांचे पुत्र सुजय यांनी ही उच्च न्यायालयात मराठी बाणा शब्दाच्या व्यावसायिक वापराला आक्षेप घेतला होता. हा शब्द आपणच प्रचलित केला आणि महाराष्ट्र, तसेच देश-विदेशात त्याला लोकमान्यता मिळाली. त्या शब्दाचे महात्म्य असे की संस्थेचा पंधरा वर्षांत 55 कोटींहून अधिक व्यवसाय झाला, असा दावा ऍड राजेंद्र पै यांच्यामार्फत करण्यात आला होता. शेमारू इंटरटेनमेंटचे वकील ऍड हिरेन कमोद व इतरांनी हा दावा खोडून काढताना, केवळ मराठी बाणा नव्हे तर चौरंगच्या मंगलगाणी दंगलगाणी, आवाज की दुनिया, आजादी 60, गाने सुहाने, अमृत लता, मधूरबाला, माणिकमोती व गंगा जमुना अशा सर्व गाण्यांच्या कार्यक्रमांचा मिळून हा व्यवसाय असल्याची बाब हांडे यांनी न्यायालयापासून लपवून ठेवल्याचे निदर्शनास आणले. 

संयुक्‍त महाराष्ट्राची संपूर्ण चळवळ मराठी बाण्याभोवती

त्याशिवाय, मराठी बाणा हा शब्द गेल्या कित्येक दशकांपासून मराठी माणसांच्या अस्मितेचा, प्रतिष्ठेचा व अभिमानाचा विषय असल्याचे सांगून अशा लिखाणाची अनेक उदाहरणे न्यायालयासमोर ठेवली. आजचे महाराष्ट्र राज्य ज्या आंदोलनाची फलश्रुती ती संयुक्‍त महाराष्ट्राची संपूर्ण चळवळ मराठी बाण्याभोवती गुंफली होती, ही बाबही न्यायालयाने मान्य केली. 

लय भारीचा दाखला 
न्या. कुलाबावाला यांनी हा निकाल देताना अभिनेता रितेश देशमुख याच्या लय भारी चित्रपटावरून उद्‌भवलेल्या वादाचा, निकालाचा संदर्भ दिला. टेकलिगल सोलुशन्सने लय भारी शब्दाच्या वापराला आक्षेप घेताना जेनेलिया रितेश देशमुख यांच्याविरुद्ध 2014 मध्ये खटला दाखल केला होता. मराठी बाणा या शब्दाप्रमाणेच लय भारी हा मराठी मुलुखातला प्रचलित शब्द असल्याचे सांगून न्यायालयाने तो आक्षेप फेटाळून लावला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com