भोंदू खरातची रवानगी मध्यवर्ती कारागृहात
अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात जामीन फेटाळला
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ५ : भोंदू अशोक खरात याचा जामीन अर्ज नाशिकच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. तर सरकारवाडा पोलिसात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिस कोठडीची मुदत संपल्याने सोमवारी (ता. ५) न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे खरातची नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल लैगिंक अत्याचाराच्या गुन्ह्यात, पीडित महिलेसोबत अश्लील कृत्य केले. तसेच, ’दैवी शाप’ मिळेल अशी भीती घालून धमकी दिली होती.
न्यायालयात सुनावणीदरम्यान संशयित खराततर्फे ॲड. राहुल कासलीवाल यांनी, गुन्हा दाखल करण्यास दोन वर्षांचा उशीर झाला असून खरात याला खोट्या प्रकरणात अडकवण्यात आले आहे. तसेच, अटकेची कारणे लिखित स्वरूपात योग्य प्रकारे दिली नसल्याने अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत जामिनाची मागणी केली. तर, राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जामीन अर्जाला तीव्र विरोध केला. आरोपीने आपल्या तथाकथित आध्यात्मिक आणि सैन्यातील निवृत्त पदाचा गैरवापर करून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले आहे. दाखल झालेल्या व्हिडिओ पुराव्यांवरून आरोपीचे कृत्य स्पष्ट होते. आरोपीचा पीडितांवर मानसिक आणि सामाजिक प्रभाव असल्याने भीतीपोटी फिर्याद देण्यास उशीर झाला असून ही सबब वैध आहे, असा युक्तिवाद केला. पीडितेच्या वकिलांनीही या युक्तिवादाला पाठिंबा दिला.
-----------
मध्यवर्ती कारागृहात रवानगी
दरम्यान, भोंदू अशोक खरातने नेवासा (जि. अहिल्यानगर) येथील कापड व्यापाऱ्यास व्यापार वृद्धीसाठी सोन्याची सिद्ध अंगठी देत फसवणूक केली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी गेल्या आठवड्यात ताब्यात घेतले होते. पोलिस कोठडीतील चौकशीतून संशयिताकडून व्यापाऱ्याच्या लुबाडलेल्या सोन्याच्या अंगठ्या मिळून आलेल्या नाहीत. कोठडीची मुदत संपल्याने खरात सोमवारी (ता. ५) न्यायालयात हजर केले असता, त्यास न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्यास नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे.