अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
कांदा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ९ : व्यापारवृद्धीचे आमिष आणि दैवीशक्तींची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या भोंदू अशोक खरात याला आर्थिक फसवणुकीच्या दुसऱ्या गुन्ह्यात शुक्रवारी (ता. ९) जिल्हा व सत्र न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली. न्या. बाबर यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.
गौळाणे शिवारातील ६० लाख रुपये किमतीची जमीन दैवीशक्तींच्या चमत्काराची भीती दाखवून केवळ २२ लाख रुपयांत खरेदी केल्याचा, तसेच पुन्हा प्लॉट घेण्याच्या बहाण्याने तक्रारदाराकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप खरातवर आहे. या प्रकरणी एका कांदा व्यापाऱ्याने सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. या गुन्ह्यात पोलिस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
दरम्यान, नेवासा येथील कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांचीही व्यापारात मोठी वाढ होण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा खरातवर आरोप आहे. त्यांच्याकडून सोन्याच्या अंगठ्या आणि सुमारे अडीच लाख रुपये रोख घेतल्याचे, तसेच ‘सिद्ध खडा’ असल्याचे सांगून बनावट अंगठी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात खरातला चार दिवसांपूर्वी न्यायालयीन कोठडी मिळाली होती.