आसोद्यात जुन्या भांडणातून कुऱ्हाडीने वार
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता.२६ : आसोदा (ता. जळगाव) येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाच कुटुंबातील संशयितांनी बाप-लेकासह घरी आलेल्या पाहुण्यांनाही मारहाण करुन प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात चार संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसोदा (ता. जि. जळगाव) येथील रामचंद्र प्रल्हाद कोळी यांच्या घरासमोर हा प्रकार घडला. मागील भांडणाच्या कारणावरून संशयितांनी रामचंद्र कोळींचा मुलगा योगेश आणि पाहुणे कैलास सुखा कोळी यांना शिवीगाळ करत चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. वाद वाढल्याने संशयित दुर्गादास कोळी याने कुऱ्हाडीच्या दांड्याने उजव्या हाताच्या मनगटावर मारून दुखापत केली. तसेच योगेश कोळी याच्या उजव्या हातावर कुऱ्हाड मारून दुखापत केली. भांडण सोडविण्यासाठी गेलेले पाहुणे कैलास कोळी यांनाही संशयित विकास बाळू कोळी याने काठीने मारहाण करून दुखापत केली. जखमींच्या तक्रारीवरून अशोक लालचंद कोळी, दुर्गादास अशोक कोळी, विलास बाळू कोळी, विकास बाळू कोळी (सर्व रा. इंदिरा नगर, आसोदा, ता. जि. जळगाव) यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक सुनील पाटील तपास करीत आहेत.
--------