Latest Crime News | नकली पिस्तूल दाखवत लुटण्याचा प्रयत्न; समयसूचकतेमुळे भामटा गजाआड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

arrested

Nashik Crime News: नकली पिस्तूल दाखवत लुटण्याचा प्रयत्न; समयसूचकतेमुळे भामटा गजाआड

मालेगाव (जि. नाशिक) : येथील कलेक्टरपट्टा भागातील जैन स्थानकाजवळील मितेश विनोद दोशी (वय ५५) यांच्या बंगल्यात घुसून ४० वर्षीय दरोडेखोराने नकली पिस्तुलचा धाक दाखवत सोने व पैसे लुटण्याचा प्रयत्न केला. लक्ष्मीपुजनाचा सण असल्याने घरात फक्त तीन महिलाच होत्या. त्याने महिलांच्या हातावर चावा घेत डोक्यावर मारले.

या घटनेचे वृत्त शहरात पसरताच बंगल्याभोवती मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. पालकमंत्री दादा भुसे तातडीने घटनास्थळी पोहोचले. महिलांना वेठीस धरणाऱ्या भामट्याला आत्मसमर्पण करण्यास सांगत त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केले. घरातील महिलांच्या समय सुचकतेने मोठा अनर्थ टळला. (attempted robbery by fake pistol criminal arrested due to women Nashik Latest Crime News)

शहरातील महावीर ऑटो स्पेअरपार्टसचे व्यावसायिक मितेश दोशी जैनस्थानकाजवळ राहतात. सोमवारी (ता. २४) दुपारी एकच्या सुमारास कृष्णा अण्णा पवार (वय ४०, रा. विद्यानगर, जोगेश्‍वरी कॉलनी, सोयगाव, मालेगाव) हा भामटा चोरीच्या इराद्याने त्यांच्या घरात शिरला. दोशी यांच्या पत्नी भावना, मुली हिमांशी व खुशबू अशा तिघीच घरात होत्या.

भामट्याने पिस्तुलाचा धाक दाखवत महिलांना घाबरविले. हिमांशी यांच्या हाताला चावा घेतला. तर भावना यांच्या डोक्यावर मारहाण केली. या प्रकारानंतर महिलांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील नागरिक धावून आले. घरात दरोडेखोर घुसल्याची चर्चा पसरल्याने नागरिकांनी तातडीने पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांना फोनवर माहिती दिली. तसेच, मितेश दोशी यांनाही कळविण्यात आले. घटनास्थळी अग्निशमन दलाचे अधिकारी संजय पवार जवानांसह दाखल झाले.

हेही वाचा: Crime Alert : दुचाकीची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न

नागरिकही मोठ्या संख्येने जमा झाले. त्याचवेळी कृष्णा हा दोशी यांच्या स्लॅबवर जाऊन बसला होता. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे तातडीने कार्यकर्त्यांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी कृष्णाला बाहेर येण्यास सांगितले. श्री. भुसे यांनी सांगितल्यानंतर कृष्णाने बाल्कनीचा दरवाजा उघडला.

पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला खाली उतरवले. त्याची चौकशी केली असता त्याच्याकडे खेळण्याचे पिस्तुल सापडल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्‍वास सोडला. या प्रकारामुळे शहर व परिसरात खळबळ उडाली होती. छावणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

हेही वाचा: Nashik Crime News : मखमलाबाद शिवारात टोमॅटोची चोरी; शेतकरी ‘भुरट्यां’मुळे त्रस्त