esakal | अखेर शाळेची घंटा वाजली! नाशिकमधील ‘त्‍या’ १२७ शाळांतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा कायम
sakal

बोलून बातमी शोधा

school starts

अखेर शाळेची घंटा वाजली अन् विद्यार्थ्यांचे चेहरे फुलले!

sakal_logo
By
अरूण मलाणी

नाशिक : जिल्‍हा प्रशासनाच्‍या परवानगीनंतर अखेर शालेय प्रांगण विद्यार्थ्यांच्‍या उपस्‍थितीने गजबजले. नवीन शैक्षणिक वर्षात प्रथमच शाळेत पाऊल ठेवल्‍याचा आनंद विद्यार्थ्यांच्‍या चेहऱ्यावर झळकत होता. सोमवारी (ता. १९) जिल्‍ह्यात २०८ शाळा भरल्‍या व आठ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी वर्गात हजेरी लावली. पहिल्‍याच दिवशी उपस्‍थितीचे प्रमाण ३४ टक्‍के राहिले. प्रत्‍यक्षात ३३५ शाळा सुरू होणे अपेक्षित असताना, शासकीय यंत्रणेतील समन्‍वयाच्‍या अभावामुळे १२७ शाळा सुरू होऊ शकल्‍या नाहीत. (Attendance-of-students-in-208-schools-marathi-news-jpd93)

समन्‍वयाअभावी १२७ शाळा बंदच

कोरोना महामारीमुळे शैक्षणिक क्षेत्र कोलमडले असताना, अध्ययन प्रक्रिया ऑनलाइन सुरू होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. अशात परिस्‍थितीत सुधारणा होत असताना शाळा सुरू करण्याची मागणी होत होती. त्‍यानुसार नुकताच झालेल्‍या जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन समितीच्‍या बैठकीत ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याबाबत शिक्कामोर्तब झाले होते.

शाळेची घंटा वाजली...

त्‍यानुसार सोमवारी जिल्‍ह्यातील शाळांचे प्रवेशद्वार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. दीर्घ कालावधीनंतर विद्यार्थी आपल्‍या मित्र-मैत्रिणींना भेटल्‍याने त्‍यांच्‍यात उत्‍साह संचारला होता. शालेय व्‍यवस्‍थापनामार्फतही विद्यार्थ्यांचे स्‍वागत करण्यात आले. जिल्‍ह्यातील २०८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. दरम्‍यान, विद्यार्थ्यांची थर्मल स्‍कॅनिंग व अन्‍य विविध उपाययोजनांसह वर्ग भरविण्यात आले.

पहिल्‍याच दिवशी संमिश्र प्रतिसाद

आठवीपासून पुढील वर्गांमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयांतील वर्ग भरविण्यास परवागी मिळाली आहे. त्‍यानुसार या २०८ शाळांतील सुमारे साडेचोवीस हजार विद्यार्थी शिक्षण घेताय. त्‍यापैकी आठ हजार ३३१ विद्यार्थी उपस्‍थित राहिले. उपस्‍थितीचे प्रमाण ३४ टक्‍के होते. येत्‍या काही दिवसांत उपस्‍थितीच्‍या प्रमाणात वाढ होईल, असा अंदाज व्‍यक्‍त होत आहे.

‘त्‍या’ १२७ शाळांतील विद्यार्थ्यांना प्रतीक्षा कायम

जिल्‍ह्यातील ३३५ शाळा सुरू होणार असल्‍याची घोषणा केली होती. प्रत्‍यक्षात २०८ शाळा सुरू झाल्या. त्यामुळे उर्वरित १२७ शाळांतील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. ग्रामपंचायत स्‍तरावरील ठराव वेळीच उपलब्‍ध न झाल्‍याने व यांसह अन्‍य विविध तांत्रिक अडचणींमुळे या शाळा सुरू करता आल्‍या नाहीत. टप्प्‍याटप्प्‍याने या शाळाही सुरू होणार आहेत.

हेही वाचा: अथांग सागराशी मीही करणार दोन हात.. कोकणगावच्या साहिलची जिद्द

हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटात दरड कोसळली

loading image