esakal | नाशिक शहरात दररोज होणार सहा हजार चाचण्या | Nashik News
sakal

बोलून बातमी शोधा

corona test

नाशिक शहरात दररोज होणार सहा हजार चाचण्या

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शेजारील नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सहा विभागात प्रत्येकी एक हजार प्रमाणे सहा हजार रॅपिड ॲन्टिजेन व आरटी- पीसीआर चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


नाशिक शहरात कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरली तरी शेजारील नगर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने तिसऱ्या लाटेची घंटा वाजली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने सज्जता ठेवली आहे. आतापर्यंत शहरात दोन लाख ३० हजार ६२८ कोरोना रुग्ण आढळले. त्यात ३, ९८७ रुग्णांचा बळी गेला. नाशिक शहर व जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असली तरी शेजारील नगरचे रुग्ण सिन्नरमार्गे नाशिक उपचारासाठी दाखल होत आहे. त्यामुळे नाशिक शहरात कोरोना रुग्ण वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोरोना चाचण्या करण्याची आवश्‍यकता निर्माण झाल्याचे मत वैद्यकीय विभागाकडून व्यक्त करण्यात आले आहे.

चाचण्या झाल्यास त्यातून कोरोना बाधितांवर तातडीने उपचार होण्याबरोबरच संपर्कात आलेल्या नागरिकांच्यादेखील चाचण्या करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेवर नियंत्रण आणणे शक्य असल्याने चाचण्या वाढविण्याचा निर्णय आयुक्त कैलास जाधव यांनी घेतला आहे. शहरात महापालिकेचे सहा विभाग असून, प्रत्येक विभागात एक हजार चाचण्या होतील. दररोज एकूण सहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. एकूण चाचण्यांपैकी सत्तर टक्के रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट तर तीस टक्के आरटी- पीसीआर चाचण्या केल्या जाणार आहे. दरम्यान, तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर एकीकडे चाचण्या वाढविताना दुसरीकडे लसीकरण वाढविले जाणार आहे. आतापर्यंत ३१ टक्के लसीकरण शहरात झाले आहे. नऊ लाख ५७ हजार ७०२ नागरिकांनी पहिला, तर चार लाख ३२ हजार ४५५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये नऊ हजार नागरिकांनी रशियन बनावटीची स्पुटनिक लस घेतली आहे.

हेही वाचा: दोघा भावांचे मृतदेह पाहून आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश


नगर जिल्ह्यातून नाशिकमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविले जाणार आहे. दररोज सहा हजार चाचण्यांचे उद्दिष्ट आहे.
- डॉ. बापूसाहेब नागरगोजे. वैद्यकीय अधीक्षक, महापालिका.

हेही वाचा: नाशिक : साडेसात महिन्यांनंतर रम्मी-जिम्मीच्या आवळल्या मुसक्या

loading image
go to top