
Nashik News: सप्तशृंगगडाच्या पायथ्याशी रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार
वणी : सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी सप्तशृंगीगड रस्ता प्रवेशद्वारलगत असलेल्या नांदुरी गावाच्या शिवारात हजारो बैलागाडा शौकिनांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यत नुकतीच झाला. यात नारायण टेंभी येथील बैलगाडा विजयी ठरून २१ हजाराचे बक्षीस पटकावले.
केतकी, नांदुरी, पारेगाव, चांदवड, अहिवंतवाडी येथील बैलगाडयांनी पहिल्या सहामध्ये क्रमांक पटकावून बक्षिसे मिळविली. विजयी बैलगाड्यांवर प्रेक्षकांनी गुलालाची उढळण करीत जल्लोष केला.
नांदुरी, सप्तशृंगीगड, मोहनदरी, कातळगाव, चिखलपाडा, दरेगाव येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या शर्यतीस जिल्हाभरातील बैलगाडा स्पर्धक शेकडो पीकअप, टेम्पोतून तसेच बैलगाडासह हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. शर्यतीत जवळपास ३५० बैलगाडयांनी नोंदणी करुन शर्यतीत सहभाग घेतला.
स्पर्धेसाठी प्रथमच नांदुरी येथे प्रेक्षकांची गर्दी उसळल्याने यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. स्पर्धा बघण्यासाठी काही जण चक्क झाडांवर, काही वाहनांच्या टपावर बसून शर्यतीचा आनंद लुटला. यात गडावर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी काही वेळ थांबून शर्यत बघून पुढे मार्गस्थ होत होते.
नांदुरी, सप्तशृंगीगड व परिसरातील गावे एकत्रितरित्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी शासनाने उठविल्यानंतर शर्यतीचे आयोजन करीत होते. दोन वर्ष कोविड काळात बैलगाडा शर्यती होऊ शकल्या नव्हत्या. मात्र मागील वर्षांपासून पुन्हा होळीच्या पूर्वसंध्येस बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जाते. यावर्षी मात्र स्पर्धकांचा व प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभल्याचे आयोजकांनी सांगितले.