दुष्काळात बाजरीचे भाव कडाडले

दुष्काळात बाजरीचे भाव कडाडले
Published on: 
दुष्काळात बाजरीचे भाव कडाडले --- प्रतिक्विंटल ३५०० पार; उत्पादन घटले, मागणी वाढली जगन्नाथ पाटील : सकाळ वृत्तसेवा कापडणे, ता. २२ : धुळे जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरविल्याने त्याचा खरिपावर मोठा परिणाम झाला. दुष्काळी परिस्थितीमुळे ज्वारी, मका आणि बाजरीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात बाजारात बाजरीची मागणी वाढल्याने भावाने साडेतीन हजार रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी याच काळात दोन हजार २०० ते दोन हजार ४०० रुपये क्विंटल असलेली बाजरी यंदा थेट साडेतीन हजार रुपये क्विंटलवर पोहोचली आहे. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा, साक्री आणि धुळे तालुक्यात बाजरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. यंदा पेरणीच्या वेळीच पाऊस लांबल्याने पेरणी क्षेत्र घटले. त्यानंतर पीकवाढीच्या अवस्थेत पावसाचा मोठा खंड पडल्याने दाणे भरण्याच्या अवस्थेत पिके करपली. त्यामुळे सरासरी हेक्टरी दहा ते १२ क्विंटल उतारा असलेला बाजरीचा उतारा यंदा अवघ्या दोन ते तीन क्विंटलवर आला आहे. उत्पादन २० ते ३० टक्क्यांवर आल्याने शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी मालच शिल्लक नसल्याची वस्तुस्थिती आहे. कोणाकडे बाजरी आहे का बाजरी! ग्रामीण भागात गव्हाच्या चपातीपेक्षा बाजरीच्या भाकरीलाच अधिक प्राधान्य दिले जाते. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी आदींकडून बाजरीच्या भाकरीलाच अधिक पसंती असते. परिणामी, बाजरीला मागणी अधिक असते. यंदा स्वतः शेतकऱ्यांवरही कोणी बाजरी विकत देता का बाजरी, अशी म्हणण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे आरोग्याविषयी जागरूकता वाढल्याने नागरिकांचा कल पुन्हा भरड धान्याकडे वळला आहे. त्यामुळे गहू, तांदळाच्या तुलनेत बाजरीची मागणी वाढली आहे. किरकोळ बाजारात बाजरी ३५ ते ४० रुपये किलोने विकली जात आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातील बाजरीची भाकरी महागली आहे. बाजरी खाण्याचे फायदे - बाजरी पोषणमूल्यांनी समृद्ध असलेले भरड धान्य - बाजरीत लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरचे प्रमाण जास्त असल्याने पचनक्रिया सुधारते - मधुमेह आणि वजन नियंत्रणासाठी बाजरीची भाकरी उपयुक्त - रक्तातील साखर नियंत्रणात राहते - हृदयरोग आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी बाजरी फायदेशीर - ग्लूटेनमुक्त असल्याने ज्यांना गव्हाची अ‍ॅलर्जी आहे, त्यांच्यासाठी बाजरी उत्तम पर्याय कोट गुजरात आणि राजस्थानमधून येणारी आवकही यंदा कमी झाली आहे. त्यामुळे बाजरीचे भाव तेजीतच राहण्याची शक्यता आहे. -अरुण पाटील, भरड धान्य व्यापारी, कापडणे कोट माझ्याकडे हिरवीगार बाजरी उपलब्ध आहे. प्रतिक्विंटले चारशेप्रमाणे ग्राहक घेऊन जात आहेत. बाजरीला एवढा भाव मिळूनही उत्पादनाचा खर्च निघणार नाही. - हिरालाल बोरसे, बाजरी उत्पादक शेतकरी, कापडणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com