Nashik : सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Social Media

सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्या

जुने नाशिक : नागरिकांनी विशेषतः तरुणांनी सोशल मीडियाचा वापर करताना काळजी घ्यावी. तेढ निर्माण करणारे आणि भडकावू, आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करू नये. अशा प्रकारचे मार्गदर्शन सहाय्यक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना यांनी केले. त्रिपुरा घटनेवरून काही शहरांमध्ये हिंसक वातावरण निर्माण झाले. शहरातही घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता. त्यानिमित्ताने भविष्यातही कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या अनुषंगाने भद्रकाली पोलिस ठाण्यात विभागीय शांतता समितीची बैठक झाली. या वेळी त्या बोलत होत्या.

जुने नाशिक परिसरातून प्रत्येक समाजाची मिरवणूक निघत असते. सर्व समाजाचे बांधव एकमेकांचे सण साजरे करत असतात. सामाजिक सलोखा येथे बघावयास मिळतो. सध्या त्रिपुरा घटनेचे पडसाद सगळीकडे उमटले. शहर अतिशय शांत होते.

अशाच प्रकारची शांतता यापुढेही ठेवण्यात यावी. कोणीही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये. कुणी असे करत असेल तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी, अशा प्रकारच्या सूचना या वेळी त्यांनी दिल्या.

या वेळी भद्रकाली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी निंबाळकर, मुंबई नाका ठाण्याचे भगीरथ देशमुख, गंगापूर ठाण्याचे रियाज शेख, तसेच निरीक्षक दत्ता पवार, दिलीप ठाकूर, सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, झाकिर हाजी, शेखन खतीब, वसीम पिरजादे, सलीम पटेल, असिफ मुलाणी, एजाज मकरानी, रामसिंग बावरी, दिलीप साळवे, शंकर बर्वे, वसंत ठाकूर, हनीफ बशीर, इब्राहिम अत्तार, अंजली शिंदे, शरयू डांगळे आदी उपस्थित होते.

वरातीमागून घोडे

शहरातील शांतता अबाधित राहण्यासाठी पोलिस विभागाकडून शांतता समितीची बैठक घेऊन विविध प्रकारच्या सूचना करण्यात येत आहे. ही चांगली गोष्ट असली तरी गेल्या काही दिवसांपूर्वी बैठक होणे आवश्यक होते. त्रिपुरा घटनेनंतर सर्वत्र अशांतता पसरली होती. त्याचवेळी बैठक न घेता आता सर्वत्र शांतता आहे अशा वेळेस बैठक घेण्याचे काय कारण. हे तर वरातीमागून घोडे असेच म्हणावे लागेल, अशी चर्चा बैठकीनंतर नागरिकांमध्ये सुरू होती.

loading image
go to top