विद्यापीठात रंगली
‘भजन पहाट’
जळगाव, ता. २ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात महात्मा गांधी जयंतीनिमित्त गांधी टेकडीवर आयोजित करण्यात आलेल्या ‘भजन पहाट’ कार्यक्रमात विविध भजनांच्या सादरीकरणातून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनाही वंदन करण्यात आले.
विद्यापीठाच्या विचारधारा प्रशाळेअंतर्गत महात्मा गांधी अध्ययन व संशोधन केंद्राच्यावतीने आज (ता. २) सकाळी गांधी टेकडीवर संगीत विभागाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, विचारधारा प्रशाळेचे संचालक प्रा. म. सु. पगारे, महात्मा गांधी अध्ययन केंद्राचे प्रमुख डॉ. उमेश गोगाडिया, ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. चंद्रशेखर वाणी, अधिसभा सदस्य प्रा. विशाल पराते यांच्यासह प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचा ‘सेल्फी पॉईंट’ उभारण्यात आला होता. कुलगुरू माहेश्वरी यांच्यासह विद्यार्थ्यांनी छायाचित्रे घेतली.
संगीत विभागाचे प्रा. कपिल शिंगणे, प्रा. तेजस मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील गायकवाड, स्नेहल सूर्यवंशी, गौरंग मेटकर, ज्योती पाटील व अक्षय दुसाने यांनी भजनांचे सादरीकरण केले.