Wedding Ceremony : लग्न समारंभातील दिवट्या बुधल्यांसाठी भाक्षीला पसंती! नियोजित स्थळ झाल्याने गैरसोय दूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A mandap erected here for Divya Budhlias

Wedding Ceremony : लग्न समारंभातील दिवट्या बुधल्यांसाठी भाक्षीला पसंती! नियोजित स्थळ झाल्याने गैरसोय दूर

नरकोळ (जि. नाशिक) : कसमादे पट्ट्यात खंडोबाचे जागृत स्थळ म्हणून नावलौकिक असलेल्या भाक्षी (ता. बागलाण) येथे लग्न समारंभातील दिवट्या बुधल्याचे माहेरघर बनले आहे. शहरासह ग्रामीण भागातील नागरिक येथे श्री खंडोबा महाराजांच्या दर्शनाबरोबरच नवसपूर्ती कार्यक्रमासाठी हजेरी लावतात. (Bhakshi choice for wedding ceremony divtya budhlya convenient planned venue nashik news)

सध्या लग्नसोहळे सुरु असल्याने दिवट्या बुधल्या व जागरण गोंधळ कार्यक्रमासाठी गर्दी वाढू लागली आहे. येथे कार्यक्रम सुरळीत पार पडतात. आठवड्यातील मंगळवार, शुक्रवार व रविवारी येथे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.

खंडोबा महाराजांचे मंदिर डोंगरावर असल्याने वैभवात भर पडते. मंगल कार्यालय, मंडपवाले, केटरर्स, वाघ्या मुरळी आदींसह परिसरातील नागरिकांना रोजगार मिळत आहे. मंदिर परिसरात श्रीफळ, भंडारासह पूजेच्या साहित्यांची दुकाने थाटली जातात.

पूर्वी हाच कार्यक्रम नागरिक गावावर घराजवळ करायचे. आता भाक्षी हे दिवट्या बुधल्यांसाठी नियोजित स्थळ झाल्याने गैरसोय दूर झाली आहे. येथे कार्यक्रमासाठी जागा मिळविण्यासाठी पहाटे लवकर यावे लागते.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

दिवट्या बुधल्यांचे महत्त्व कायम

कसमादेसह खानदेशमध्ये लग्नसोहळे असलेल्या कुटुंबात जागरण गोंधळ व दिवट्या बुधल्यांचा कार्यक्रम केला जातो. विवाहापूर्वी दिवट्या बुधल्यांचा कार्यक्रम केला जातो. अनेक कुटुंबीय घराजवळच कार्यक्रम करतात.

काही कुटुंबीय श्री खंडेरायाचे देवस्थान असलेल्या ठिकाणी कार्यक्रम करतात. जागरण गोंधळ, दिवट्या बुधल्या व पुजाविधीला विशेष महत्त्व असून यानिमित्ताने नातेवाईक, मित्र परिवार एकत्र येतात. लग्नसमारंभाची सुरवात येथूनच होते.

"दिवट्या बुधल्या कार्यक्रम पूर्वी गावी होत होते. आता भाक्षी हे खंडोबाचे जागृत स्थळ असल्याने देवाच्या ठिकाणी कार्यक्रम करण्याकडे भाविकांचा कल असतो. निसर्गरम्य वातावरण असल्याने अनेक कुटुंबीय भाक्षी येथे धार्मिक कार्यक्रमासाठी आवर्जून येतात." - संजय पवार, सटाणा