NSK26H31927
जळगाव : भाऊंच्या उद्यानातील पाण्याच्या टाकीच्या गळतीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करताना नगरसेविका वैशाली पाटील.
भाऊंच्या उद्यानातील पाण्याच्या
टाकीतून आठ दिवसांपासून गळती
नगरसेविका पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १० : शहरातील भाऊंच्या उद्यानात असलेल्या पाण्याच्या टाकीमधून गेल्या आठ दिवसांपासून पाणी गळत असल्याने शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे. त्याचबरोबर टाकीचा स्लॅब कमकुवत होऊन कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत नगरसेविका वैशाली पाटील यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत तातडीने दुरुस्तीच्या सूचना केल्या.
भाऊंच्या उद्यानात दररोज सायंकाळी महिला, लहान मुले आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. पाण्याच्या टाकीजवळच नागरिकांचा अधिक वावर असल्याने गळतीचा प्रश्न केवळ पाण्याच्या अपव्ययापुरता मर्यादित राहिलेला नाही. सतत पाणी झिरपत राहिल्याने टाकीच्या स्लॅबचे नुकसान होण्याची शक्यता आहे. स्लॅब अचानक कोसळल्यास गंभीर दुर्घटना घडू शकते. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.
या पार्श्वभूमीवर वैशाली पाटील यांनी शनिवारी दुपारी १२ वाजता उद्यानात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून घेत गळतीच्या समस्येबाबत जाब विचारला. नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित विषयात दिरंगाई न करता टाकीची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती त्वरित पूर्ण करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.