Latest Marathi News | भाज्यांच्या दरांत मोठी घसरण; रात्री उशिरापर्यंत आठवडे बाजार गजबजला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vegetable market

Nashik : भाज्यांच्या दरांत मोठी घसरण; रात्री उशिरापर्यंत आठवडे बाजार गजबजला

नाशिक : नोव्हेंबरच्या सुरवातीपासूनच परतीच्या पावसाने उघडीप दिली. त्यामुळे बाजार समितीतील सर्वच भाजीपाल्याची आवक सुरळीत झाल्याने व तुलनेत मागणी घटल्याने बुधवारच्या आठवडे बाजारात गवार वगळता सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या दरांत मोठी घट झाली. ही संधी साधत महिलांनी खरेदीसाठी गर्दी केल्याने रात्री उशिरापर्यंत आठवडे बाजार गजबजला होता. (Big fall in vegetable prices For weekly bazar buzzed late into night Nashik News)

परतीच्या पावसाने बळीराजाला मोठा दणका दिल्याने गत महिन्याच्या अखेरपर्यंत बाजार समितीतील भाजीपाल्याची आवक मंदावली होती. त्यामुळे सर्वच प्रकारच्या भाजीपाल्याच्या दराने मोठी उसळी घेतली होती. मात्र, त्यानंतर परिस्थिती सुरळीत झाल्याने समितीतील भाज्यांच्या आवकेतही मोठी वाढ झाली. त्या तुलनेत मागणी नसल्याने बुधवारी (ता.९) आठवडे बाजारात पालेभाज्या, फळभाज्यांसह वेलवर्गीय भाज्या अवघ्या तीस ते चाळीस रुपये किलो दराने उपलब्ध होत होत्या.

भाज्यांच्या दरांत मोठी घट झाल्याने सुखावलेल्या मध्यमवर्गीय महिलांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बाजारात आठ साडेआठनंतरही विक्रेते व खरेदीदारांची मोठी वर्दळ होती. विशेष म्हणजे गत आठवड्यापर्यंत पावसामुळे भाज्या मोठ्या प्रमाणावर खराब झालेल्या होत्या. परंतु, बाजारात आवक झालेल्या पालेभाज्यांसह सर्वच फळभाज्या चांगल्या दर्जाच्या त्याही अल्पदरात उपलब्ध झाल्याने ग्राहकांत मोठा उत्साह होता.

गवार @ १६० रुपये

इतर भाज्यांच्या दरांत मोठी घसरण झालेली असली तरी गावठी गवार मात्र भाव खाऊन गेला. किलोभर गावठी गवारसाठी एकशे चाळीस रुपये मोजावे लागत होते.

हेही वाचा: Nashik Rural Police Recruitment : नाशिक ग्रामीणच्या 164 जागांवर होणार पोलिसभरती

भाज्यांचे दर असे (किलोमध्ये)-

टोमॅटो- २० रुपये

वांगी- २० ते ३० रुपये

ढोबळी मिरची- २० ते ३० रुपये

कांदे- २० ते ३० रुपये

बटाटे- २५ ते ३० रुपये

कोबी, फ्लॉवर- १० रुपये गड्डा.

गिलके, कारली- २० ते ३० रुपये

मेथीची जुडी- २० रुपये

कोथींबीर (छोटी जुडी) १० रुपये

शेपू- १५ ते २० रुपये

पालक- १५ रुपये

कांदापात- २० रुपये.

हेही वाचा: Nashik : ZP कार्यकारी अभियंता कंकरेजविरोधात झिरवाळ, खोसकर आक्रमक!