Latest Marathi New | नाशिक महापालिका मुख्यालयात बायोमेट्रिकचा फज्जा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik Municipal Corporation

नाशिक महापालिका मुख्यालयात बायोमेट्रिकचा फज्जा

नाशिक : महापालिका कर्मचाऱ्यांच्या हजेरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक बायोमेट्रिक पद्धत अमलात आणली असली तरी, या पद्धतीवरदेखील महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वर्चस्व निर्माण केले आहे. बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावून दिवसभर थांग पत्ता नसलेले कर्मचारी मात्र संध्याकाळी हजेरी लावण्यासाठी रांगेत उभे असल्याची तक्रार एका नागरिकाने प्रशासनाकडे केल्यानंतर प्रशासनाने सेवा संहितेचे हत्यार बाहेर काढले. (Latest Marathi News)

महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी घेतली जाते. मशिनवर पंच करताना अंगठ्याचा ठसा महत्त्वाचा असतो त्यामुळे संबंधित व्यक्ती हजर असेल तरच नोंद होते अन्यथा नाही. त्यामुळे बायोमेट्रिक पद्धतीमध्ये संबंधित व्यक्ती हजर असणे आवश्यक आहे. यापूर्वी रजिस्टरवर स्वाक्षरी केली जात असल्याने त्याचा फायदा घेत कर्मचारी स्वाक्षरी करून गायब होत होते. स्वाक्षरी करण्यासाठीदेखील पगारी कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याचे प्रकार समोर आले होते. महापालिकेचे माजी आयुक्त डॉ. प्रवीण यांनी बायोमेट्रिक पद्धत आणून बोगस हजेरीवर नियंत्रण आणले होते.

कोरोना काळ वगळता गेल्या सहा वर्षांपासून बायोमेट्रिक हजेरी सुरू आहे. परंतु, एकदा हजेरी लागल्यानंतर दिवसभर कर्मचारी काय करतात, याची नोंद होत नाही. मात्र, संध्याकाळचे पंचिंग होत असल्याचे प्रकार समोर आले. वैभव देशमुख यांना महापालिकेचे संदर्भात काम असल्याने मुख्यालयात अनेकदा चकरा मारल्या, परंतु कर्मचारी जागेवर नसल्याने त्यांना परतावे लागत होते. अनेकदा असे प्रकार घडल्यानंतर ऑनलाइन तक्रार दाखल केली. त्यानंतर प्रशासित उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी कामाच्या संहिते संदर्भात सूचना दिल्या.

नोंद बंधनकारक

बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी लावणे, महापालिका मुख्यालयास विभागीय कार्यालयांमध्ये वावरताना ओळखपत्र लावणे, बाहेर पडताना हालचाल रजिस्टर मध्ये नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे.