
भाजपचे बौद्धिक युवा सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन
नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीच्या (Nashik Municipal Elections) पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी व विरोधकांपैकी प्रमुख असलेल्या अनुक्रमे शिवसेना व भाजपच्या संघटनात्मक पातळीवर बळकटीचा भाग म्हणून विविध उपक्रम राबविताना महापालिका, जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ नाशिकमधूनच फोडण्याची तयारी करण्यात आली आहे. भाजपकडून बौद्धिक वर्गाच्या माध्यमातून नगरसेवकांची मोट बांधण्याचा प्रयत्न होत आहे, तर शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवा सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये होत असून, त्यासाठी डझनभर मंत्री हजेरी लावणार आहे.
पुढील वर्षाच्या प्रारंभी राज्यातील बावीस महापालिकांच्या निवडणुका होत आहे. त्यासाठी राजकीय व प्रशासकीय तयारी सुरू झाली आहे. इतर मागासवर्गीयांचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. १७ जानेवारीला आणखी एक निर्णय होणार असून, त्यानंतर निवडणुकीवर शिक्कामोर्तब होईल. न्यायालयाच्या निकाल निवडणुकांच्या विरोधात लागला तरी फार तर एक ते दीड महिन्याचा फरक पडेल, असे जाणकरांचे मत आहे. दरम्यान, राजकीय पक्षाकडून मात्र जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून विद्यमान नगरसेवकांची मोट बांधताना प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी नाशिकचे मैदान निश्चित करण्यात आले आहे. विशेष करून शिवसेनेने नाशिकच्या मैदानातून निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली असून, येत्या ८ व ९ जानेवारीला शिवसेनेची अंगीकृत संघटना असलेल्या युवा सेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यभरातील युवकांना युवा सेनेशी जोडले जाणार आहे. पपय्या नर्सरी जवळील डॉ. एपीजे अब्दुल कलाम कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अधिवेशन होईल. अधिवेशनासाठी राज्यभरातील दोन हजारहून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित केले जाणार आहे.
भाजपचीही रणनीती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मुख्यत्वे लढाई भाजप विरुद्ध शिवसेनेत होणार आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना एकसंध ठेवण्यासाठी भाजपकडून बौद्धिक वर्ग सुरू करण्यात आले आहे. इगतपुरी तालुक्यात एका खासगी रिसॉर्टवर नुकतेच प्रशिक्षण वर्गाची सांगता झाली.