
लसवाटपात नाशिकवर अन्याय; भाजप नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली भावना
नाशिक : मुंबई व पुण्याच्या तुलनेत नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असताना लसीकरणाच्या (Corona Vaccination) बाबतीत मात्र शासनाकडून नाशिकवर अन्याय होत असल्याची भावना भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता. ११) जिल्हाधिकारी सूरज मांढरे (Suraj Mandhare) यांच्यासमोर मांडली. (BJP leaders read out the problems before the district collector)
नाशिकमध्ये तातडीने लस वाढवून पुरवठा सुरळीत करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.
शहर व जिल्ह्यात ऑक्सिजनची कमतरता भासल्याने भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठत व्यथा मांडली होती. त्यानंतर आता लसीकरणात नाशिकवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांनी धडक दिली. मुंबई-पुण्याच्या तुलनेत नाशिकला कमी डोस मिळत असल्याने लसीकरण मोहीम सुरळीत नाही. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अधिक लशी उपलब्ध व्हाव्यात, अशी मागणी केली. जिल्हाधिकारी मांढरे यांनी तत्काळ मुंबईतील एफडीए कार्यालयाशी संपर्क साधत लशीबाबत माहिती घेतली. या वेळी पुरवठा अधिकाऱ्यांनी नाशिकला अधिक लस देण्याचे मान्य केले, अशी माहिती शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली. या वेळी महापौर सतीश कुलकर्णी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, महापालिका सभागृहनेते सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, महिला आघाडीच्या अध्यक्षा हिमगौरी आहेर-आडके, उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार, ज्येष्ठ नेते विजय साने आदी उपस्थित होते.
हेही वाचा: नाशिक महापालिकेला लसीचे ५ हजार ७०० डोस; ठराविक केंद्रांवरच मिळणार लस
लॉकडाउनचे स्वागत, मात्र उपाययोजना हव्यात
१२ मेच्या मध्यरात्रीपासून जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. मात्र लॉकडाउन जाहीर करताना अनेक उपाययोजना गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. भाजीपाला विक्रेते, दूध विक्रेते यांना सूट द्यावी, औद्योगिक वसाहतींमध्ये पडून असलेला तयार माल शहराबाहेर जाण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. कडक लॉकडाउन करताना नागरिकांना मास्क बंधनकारक करावा, विनाकारण लोकांना बाहेर पडू देऊ नये, आदी सूचना करण्यात आल्या.
(BJP leaders read out the problems before the district collector)
हेही वाचा: नाशिक शहर-जिल्ह्यात कडक लॉकडाउन; जाणून घ्या लॉकडाउनची नियमावली
Web Title: Bjp Leaders Read Out The Problems Before The District Collector Nashik
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..