esakal | नाशिकचे भाजपचे नेते संजय राऊतांच्या मुक्कामी; योगायोग..अपघात..की आणखी काही?
sakal

बोलून बातमी शोधा

bjp and sanjay raut

भाजपचे नेते राऊत यांच्या मुक्कामी; नाशिकमध्ये चर्चेला उधाण

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक दौऱ्यावर आलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) ज्या हॉटेलमध्ये मुक्कामी थांबून शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेत होते. त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे (bjp) नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती गणेश गिते व मुकेश शहाणे तेथे पोचले. हा योगायोग होता. अपघाताने त्याचवेळी पोचले, की आणखी काही, अशी चर्चा शहरात रंगली आहे.

भाजपचे गणेश गिते, शहाणे पोचले संजय राऊत यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी

काही दिवसांपासून शिवसेना व भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना आव्हाने-प्रतिआव्हाने दिली जात आहेत. दोन्ही पक्ष व ठराविक नेत्यांमधील वाद विकोपाला गेल्याने निवडणूक कुठले टोक गाठणार, याबद्दल तर्क-वितर्क लढविले जात आहेत. त्यातच शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख व खासदार संजय राऊत नाशिक दौऱ्यावर आले. शनिवारी (ता. १२) रात्री उशिरा हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये ते मुक्कामी होते. रविवारी (ता.१३) दुपारपर्यंत त्यांनी संघटनात्मक आढावा घेतला. मुंबईकडे प्रस्थान करीत असतानाच स्थायी समितीचे सभापती गणेश गिते व नगरसेवक मुकेश शहाणे हॉटेल एक्सप्रेस इनमध्ये पोचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. श्री. गिते, शहाणे नेमके कशासाठी आले. याबद्दल तर्क-वितर्क लढविले गेले. वादाच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांची धडकी भरली. गिते नेमके कशासाठी आले, याबाबत शेवटपर्यंत स्पष्टता झाली नाही. मात्र, राजकीय चर्चांना उधाण आले. यापूर्वीही याच हॉटेलमध्ये भाजपचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी खासदार राऊत यांची भेट घेतली होती. त्या वेळीही अनेक चर्चा रंगल्या होत्या.

असंतुष्टांकडून गैरसमज पसरविण्याचे उद्योग - गणेश गिते

मी भाजपचा जबाबदार पदाधिकारी असून, स्थायी समिती सभापती या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहे. प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांशी माझे वैयक्तिक संबंध आहेत. त्या अनुषंगाने मी रविवारी दुपारी हॉटेलमध्ये माझ्या वैयक्तिक कामासाठी गेलो होतो. त्याचवेळी खासदार राऊत तेथे असल्याचे समजले. मात्र, शिवसेनेतील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांकडून माझ्याबद्दल गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न झाला. मला राऊत यांना भेटायचेच असते, तर मुंबईत जाऊन भेट घेता येऊ शकते, त्यासाठी नाशिकमध्ये स्थानिक नेत्यांसमोर भेट घेण्याची आवश्‍यकता नाही. शिवसेना संपर्कनेते संजय राऊत यांची गुप्त भेट घेतली, असे तीनपट बाण शिवसेनेत फारशी किंमत नसलेल्या नेत्याने फेकले असावेत. मुळात अशी गुप्त भेट घ्यायची असती, तर नाशिकपासून तीन तासांवर असलेल्या मुंबईची आम्ही निवड केली असती. नाशिकमध्ये भेट घेतल्यानंतर त्यांची चर्चा होणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे अशी चर्चा घडवून आणण्याइतके आम्ही मूर्ख नाही. मी भारतीय जनता पक्षाचा एकनिष्ठ कार्यकर्ता असून, पक्षाने मला सलग दुसऱ्यांदा सभापतीची संधी दिली आहे. त्यामुळे अशा चर्चांना मी भीक घालत नाही. माझी निष्ठा माझ्या पक्षश्रेष्ठींना चांगली माहीत आहे. एखाद्या पक्षाचा नेता एखाद्या हॉटेलमध्ये उतरला असेल, तर त्या हॉटेलमध्ये अन्य राजकीय नेत्यांनी जाणे टाळले पाहिजे का? या ठिकाणी गेलो म्हणजे संबंधित नेत्याची भेट घ्यायलाच गेलो, असा अर्थ कसा काढू शकतात. उद्या योगायोगाने अशी भेट घडली, तर असा राजकीय दुजाभाव करणारे आम्ही नक्कीच नाही. शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. मात्र, त्यातून कोणी वेगळा अर्थ काढला नाही व समजूतदार राजकीय व्यक्तींनी तर काढू नये, असा राजकीय मूर्खपणा भाजपमधील समजूतदार आणि सद्सद्विवेकबुद्धी ठेवणारे कार्यकर्ते कधी करू शकणार नाहीत, याची नोंद अफवा पसरवणाऱ्यांनी घ्यावी.

हेही वाचा: भगवी शाल घालून महादेव जानकरांचा अंकाई किल्ल्यावर मुक्काम?

योग्य वेळी उत्तर मिळेल : शहाणे

स्थायी समिती सभापती गणेश गिते व मी शिवसेना संपर्कनेते संजय राऊत यांची भेट घेतल्याची निरर्थक बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. मुळात शिवसेनेत सध्या अस्वस्थ असलेल्या व गटबाजी करणाऱ्या एका पदाधिकाऱ्याची ही करामत आहे. पक्षश्रेष्ठींचा आमच्यावर विश्वास असून, वाघाच्या जबड्यात हात घालून परत येण्याची आमची हिंमत आहे. एखादं-दुसऱ्या नेत्यांची भेट घेतली म्हणजे संबंधित पक्षामध्ये प्रवेश केला, असा अर्थ काढणे चुकीचे आहे. बाकी शहाण्यांना शब्दाचा मारा पुरेसा. योग्य वेळी उत्तर दिले जाईल, असे भाजपचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

हेही वाचा: सलग दुसऱ्यावर्षी मुस्लिम बांधव हज यात्रेपासून वंचित

loading image
go to top